RBI ने रेपो दरात कपात केल्यानंतर 'या' बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर केले कमी (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Kotak Mahindra Bank Marathi News: कोटक महिंद्रा बँकेने मुदत ठेवी (FD) व्याजदरात बदल केले आहेत. निवडक कालावधीच्या एफडीवरील व्याजदर १५ बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी करण्यात आले आहेत. हे नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच ९ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केल्यानंतर बँकेने हा बदल केला आहे, ज्यामुळे रेपो रेट आता ६.२५ टक्क्या वरून ६ टक्क्या वर आला आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आरबीआयचे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, कोटक महिंद्रा बँक आता नियमित ठेवीदारांसाठी २.७५% ते ७.३०% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.२५% ते ७.८०% पर्यंत व्याजदर देत आहे. तथापि, व्याजदरात ही कपात निवडक मुदतीच्या मुदत ठेवींवर करण्यात आली आहे, ज्यावरून असे दिसून येते की बँकांनी आता रिझर्व्ह बँकेने कमी केलेल्या रेपो दरानुसार मुदत ठेवींवरील व्याजदर समायोजित करण्यास सुरुवात केली आहे. आता नवीन व्याजदरांबद्दल जाणून घेऊया.
३९० दिवसांच्या (१२ महिने २५ दिवस) एफडी वर जूना व्याजदर ७.४० टक्के होता, तो कमी करून ७.२५ टक्के करण्यात आला आहे.
३९१ दिवस ते २३ महिन्यांपेक्षा कमी दिवसांच्या एफडी वर जूना व्याजदर ७.४० टक्के होता जो आता ७.३० टक्के इतका असेल.
२३ महिन्यांच्या कालावधीसाठीच्या एफडी वरील जूना व्याजदर ७.३० टक्के होता तर नविन व्याजदर ७.२५ टक्के असेल.
कोटक महिंद्रा बँकेने एफडीवरील व्याजदरात फारशी कपात केलेली नसली तरी, रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल करण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळाले आहेत. भविष्यात, इतर बँका देखील एफडीवरील व्याजदरात कपात करण्याची घोषणा करू शकतात. तसेच, गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कमी केले जाऊ शकतात.
जर तुम्हाला बँकेत एफडी करायची असेल तर तुम्हाला हे काम लवकरच करावे लागेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रेपो दरात कपात झाल्यानंतर बँका एफडीवरील व्याजदर कमी करतील. जर एखाद्या ग्राहकाने बँकेने व्याजदर कमी करण्यापूर्वी एफडी केली तर त्याला बँकेच्या सध्याच्या व्याजदराचा लाभ मिळेल.