भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला फार महत्व दिले आहे. सोन्याची आभुषणे ही व्यक्तीला आकर्षक बनवतातच मात्र ज्यावेळी अडीअडचण येते त्यावेळी हेच सोने तारणहार ठरते. या सोन्यावर कर्ज घेता येते. सोनार, बॅंक, सोने तारण संस्था या अशास्वरुपाचे कर्ज देत होत्या आता त्यामध्ये जगातील सर्वात मोठी टेक कंपनी असलेल्या गुगलची भर पडली आहे. त्यामुळे लोकांना सोन्यावरील कर्ज घेणे अगदी सहजशक्य होणार आहे.
गुगलचा आज दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी ‘गुगल फॉर इंडिया’ (Google For India) हा उपक्रम पार पडला. गुगलच्या या उपक्रमाचे हे 10 वे वर्ष आहे. या कार्यक्रमामध्ये गुगल पे ( Google Pay ) वर गोल्ड लोन ऑफर करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच अनेक घोषणा या कार्यक्रमामध्ये करण्यात आल्या. ज्यामध्ये अदानी ग्रुप आणि क्लिअरमॅक्स सोबतची स्वच्छ उर्जेसाठीची भागीदारी आणि गुगल जेमीनी (Google Gemini ) ला हिंदीसहित 8 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा समावेश आहे.
आता गुगल पे वर गोल्ड लोन
देशातील डिजीटल व्यवहारांसाठी सर्वात जास्त व्यवहार होणाऱ्या प्लॅटफॉर्मपैकी एक असणाऱ्या गुगल पे वर ही गोल्ड लोन उपलब्ध होणार आहे. या सुविधेसाठी गुगलने मुथूट फायनान्सबरोबर भागीदारी केली आहे. या कर्जासाठी नेमकी कशी प्रक्रिया असणार आहे याबद्दल लवकरच कंपनीकडून कळविण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे गुगल पेनेही आपली कर्ज मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
Google Pay मध्ये UPI सर्कल
गुगल पे वर आता UPI सर्कल हे नवीन वैशिष्ट्य अंतर्भूत केले गेले आहे. या UPI सर्कलच्या मदतीने कोणताही वापरकर्ता हा फक्त एका क्लिकवर त्याच्या मित्रांना अथवा नातेवाईकांना पेमेंट करू शकणार आहे. अलीकडेच सरकारकडून UPI सर्कल डेलिगेटेड ही पेमेंट सेवा सुरू करण्यात आली होती.
Google ची स्वच्छ ऊर्जेसाठी अदानी समूह आणि क्लिअरमॅक्ससाठी भागीदारी
गुगलने भारतातील महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अदानी समूह आणि क्लियरमॅक्सबरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारी अंतर्गत, गुजरातमधील खवडा येथे 61.4 मेगावॅटचा सौर उर्जा-पवन उर्जा असा संकरित प्रकल्प, राजस्थानात 6 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आणि कर्नाटकात 59.4 मेगावॅटचा पवन उर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारतीय ग्रीडमध्ये 2026 पर्यंत गुगलला 186 मेगावॅट नवीन स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता जोडणे अपेक्षित आहे.
गुगल जेमिनी लाईव्ह आता हिंदी भाषेमध्ये सुरु केले गेले आहे. येत्या काही दिवसातच कंपनी मराठी, बंगाली, गुजराती, तेलगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि उर्दू भाषेत जेमिनी लाईव्ह सुरु करणार आहे.