ASCI च्या 40व्या वर्धापनदिनी मोठा बदल, सुधांशू वत्स यांची अध्यक्षपदी नियुक्ती (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अॅडव्हर्टाइझिंग स्टॅण्डर्ड काउन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय) ने आपल्या ३९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम) संस्थेचे नवे अध्यक्ष म्हणून पिडिलाइट इंडस्ट्रीज लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर सुधांशू वत्स यांचे नाव निश्चित केले. एएससीआय या भारताच्या जाहिरातींसाठीच्या स्वयं-नियामक संस्थेला ऑक्टोबर महिन्यात ४० वर्षे पूर्ण होत असताना झालेली ही नियुक्ती संस्थेच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या वर्षामध्ये झाली आहे.
मुलनलोव ग्लोबलचे एस सुब्रमन्येश्वर यांची उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. प्रोव्होकॅटोर अॅडव्हायझरी येथले प्रिन्सिपल व या क्षेत्रातील जुनेजाणते नाव असलेल्या परितोष जोशी यांना मानद कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
वत्स म्हणाले, “एएससीआयची भूमिका कधी नव्हे इतकी महत्त्वाची बनली आहे. नव्या तंत्रज्ञानांच्या आणि नव्या रचनांच्या साथीने जाहिरातींचे स्वरूप बदलत असताना, त्या एकात्मतेने तयार केल्या जाव्यात. उत्पादनाकडून दिल्या जाणाऱ्या वचनांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या, समुदायाचा आदर राखणाऱ्या व ग्राहकांचे भान ठेवणाऱ्या असाव्यात याची खातरजमा करून घेणे ही आपली जबाबदारी आहे. जिथे विश्वासाला सहज तडे जातात अशा वातावरणात स्वयं-नियमन उद्योगक्षेत्राला मार्गदर्शन पुरवते आणि जनतेलाही आश्वस्त करते. उच्च दर्जा राखण्यासाठी, जबाबदार सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जाहिरातदारीमधील विश्वास अधिक भक्कम करण्यासाठी जाहिरातदार, एजन्सीज, प्लॅटफॉर्म्स आणि ग्राहकांच्या साथीने काम करण्यास मी उत्सुक आहे. या प्रयत्नांच्या मर्मस्थानी केवळ एक साधे तत्व आहे – ग्राहकांचे हित सदैव अग्रस्थानी आणि केंद्रस्थानी ठेवा.”
मावळते अध्यक्ष पार्थ सिन्हा पुढे म्हणाले, “अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाल जरी संपत असला तरीही एएससीआयची वाटचाल तितक्याच जोमाने सुरू राहणार आहे. एका सतत विस्तारत राहणाऱ्या वाक्यातील केवळ एक अर्धविराम आहे. गेल्या वर्षांमध्ये आम्ही एका पहारेकऱ्याच्या भूमिकेच्या पुढे जात जबाबदार संवाद घडवून आणणारे माध्यम बनण्यापर्यंतचा प्रवास केला. केवळ देखरेख ठेवली नाही तर भागीदार बनलो. डिजिटल स्पर्धाक्षेत्रामध्ये आम्ही ठामपणे पदार्पण केले आहे कारण जबाबदारीने तंत्रज्ञानाच्या पावलांशी पावले जुळवून चालायला हवे. आणि ग्राहकांचा विश्वास ही तुकड्यातुकड्यांत काम करणारी एखादी महत्त्वाकांक्षा नव्हे तर संपूर्ण देशभरासाठीची एक भाषा आहे याचे स्वत:ला स्मरण करून देत आम्ही एएससीआयच्या कार्यक्षेत्राचा विस्तारही सुरू केला आहे. ही कहाणी पुढे अशीच सुरू झाली हा दिलासा मनात ऊघेऊन आणि हा प्रवास सामायिक हेतू व सामुदायिक शक्तीचा बनावा याची काळजी घेणाऱ्या संचालक मंडळ व सेक्रेटरिएटमधील माझ्या सहकाऱ्यांप्रती अपार कृतज्ञतेच्या भावनेने मी हे पद सोडत आहे, ”
लहान मुलांसाठी अॅडव्हर्टाइझिंग व मीडिया साक्षरता कार्यक्रम ज्यामध्ये दहा लाखांहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाईल. ‘अॅडवाईज’ (AdWise) हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना जाहिरातीमधील संदेश ओळखण्यास, त्याबद्दल प्रश्न विचारण्यास व त्यांचे मूल्यमापन करण्यास सक्षम बनवेल, व त्यायोगे दिशाभूल करणाऱ्या व घातक जाहिरातींना फसण्याचे प्रमाण कमी होईल.
तंत्रज्ञान आणि स्क्रीन्सच्या सोबतच मोठ्या होत असलेल्या मुलांच्या नव्या पिढीसाठी जबाबदार जाहिराती बनविण्यासाठी एक चौकट विकसित करण्याच्या कामी मदत करण्यासाठी जेन अल्फामध्ये लोक व संस्कृतींशी संबंधित एथ्नोग्राफिक संशोधन हाती घेणे.
बेंगळुरू आणि दिल्लीमध्ये पाऊलखुणा विस्तारणे
खेतान अँड कंपनी या अग्रगण्य लॉ फर्मच्या सहयोगाने भारतातील जाहिरातींसाठीच्या संकेत व कायद्यांसाठी एक सर्वसमावेशक संसाधन उपलब्ध करून देणे.
लॉजिकल इंडियन आणि मार्केटिंग माइंड्स यांच्या सहयोगाने एका पॉडकास्ट मालिका सुरू करणे
एएससीआय सदस्यांसाठी एक व्हिज्युअल असेट निर्माण करणे, ज्याचा वापर ते आपल्या पत्रव्यवहारांत व वेबसाइट्सवर करू शकतील व भारतात जबाबदार जाहिरातदारीप्रती आपल्या बांधिलकीचा संकेत देऊ शकतील.
१९८५ साली स्थापन झालेल्या एएससीआयने जाहिरात क्षेत्राने एक उत्तरदायित्वाची संस्कृती उभारण्यासाठीचा व ग्राहकांच्या संरक्षणासाठीचा एक स्वयंसेवी उपक्रम म्हणून सुरुवात केली. एक आचारसंहिता म्हणून सुरू झालेल्या या प्रयत्नाची लवकरच धोरणकर्ते व नियामकांकडून दखल घेतली गेली. संस्थेने तयार केलेली नियमांची चौकट केबल टीव्ही कायदा, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ आणि काही प्रमुख नियामकांकडून स्वीकारली गेली. पुढील कालावधीमध्ये एएससीआयने आपल्या उपक्रमांमध्ये आरोग्य, ग्राहक व्यवहार, शिक्षण, आयुष आणि इतर मंत्रालयांशी सहयोग साधला.
नियमांची एक स्वयंसंचालित चौकट असूनही एएससीआयच्या ग्राहक तक्रार समितीच्या शिफारशींचे पालन होण्याचे प्रमाण असाधारण आहे, यातून या उद्योगक्षेत्रात झालेला तिचा स्वीकार व तिचे स्थान दिसून येते. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये छापील आणि टीव्हीसाठी शिफारशींचे पालन होण्याचा दर अनुक्रमे ९८ टक्के आणि ९७ टक्के होता तर डिजिटल जाहिरातींसाठी तो ८१ टक्के होता.
एएससीआयच्या भूमिकेचा सर्वोच्च न्यायालयातील अनेक प्रकरणांमध्येही उल्लेख सापडतो, ज्यामुळे ग्राहकांच्या संरक्षणातील संस्थेचे महत्त्व मान्य केले जात असल्याची बाब अधिकच ठळकपणे समोर येते.
अलीकडच्या वर्षांत एएससीआय अकॅडमी सुरू झाल्यामुळे संस्थेकडून दिला जाणारा कौल नियमपालनापुरता मर्यादित राहिलेला नसून सक्रीय शिक्षण, विचारांचे नेतृत्व आणि नवसंकल्पनांपर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. त्याचबरोबर संस्थेने डार्क पॅटर्न्सपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरापर्यंत ते जाहिरातींतील पुरुषत्वाचे चित्रण तसेच डिजिटल इन्फ्लुएन्सर्सप्रती दाखवल्या विश्वासापर्यंत विविध आधुनिक आव्हानांविषयी जारी केलेल्या श्वेतपत्रिका आणि संशोधन अहवालांनी या उद्योगक्षेत्राला विचारप्रवृत्त केले आहे व त्यात उत्क्रांती घडवून आणली आहे. या प्रयत्नांसाठी एएससीआयला दोन प्रतिष्ठेचे जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेने जाहिरातींच्या क्षेत्रात इन्फ्लुएन्सर्सची वर्तणूक, डार्क पॅटर्न्स, क्रिप्टोकरन्सी, पर्यावरणपूरकतेचे दावे आणि लैंगिक ओळखींचे साचेबद्ध चित्रण या विषयांवरील मार्गदर्शक तत्वांचा पाया घातला आहे.
आज, नीतिमूल्य जपणाऱ्या जाहिरातदारीच्या भविष्याला आकार देण्यामध्ये एएससीआयची जितकी भूमिका आहे तितकीच ती तक्रारींवर कारवाई करण्याच्या व जाहिरातींचे परीक्षण करण्यामध्येही आहे.
या दृष्टीने अग्रगण्य मार्केटर्स आणि एजन्सीसच्या साथीने संस्थेकडून राबविले जाणारे मास्टर क्लासेस तसेच देशाच्या अग्रगण्य मीडिया व अॅडव्हर्टाइझिंग महाविद्यालयांमध्ये राबविले जाणारे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जाहिरातदारांना जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात नियमांचा भंग झाल्याचे लक्षात येऊन नंतर महागडे बदल करावे लागू नयेत, त्याऐवजी त्यांना निर्मितीपूर्व टप्प्यावरच आचारसंहितेचे अनुपालन होत आहे किंवा नाही हे तपासता यावे याची खातरजमा संस्थेची सल्लागार सेवा करत आहे.
त्याचबरोबर जागतिक भागीदारी अधिक भक्कम करण्याचा व डिजिटल माध्यमाला प्राधान्य देणाऱ्या जाहिरातींच्या वास्तवाला प्रतिसाद देऊ शकेल अशाप्रकारच्या संशोधन, नवसंकल्पना व फ्रेमवर्क्समध्ये गुंतवणूक करताना जगभरात अशाचप्रकारचे काम करणाऱ्या मंडळांबरोबर ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचाही एएससीआयचा हेतू आहे.