फोटो सौजन्य - Social Media
शेती करून स्वतःचा व्यवसाय उभा करणे हि फार मोठी गोष्ट आहे. यातून अपार कष्ट करत केरळमधील जीतू थॉमस यांनी यश साध्य केले आहे. आपल्या आई लीना यांच्यासह मशरूमची शेती करून यशस्वी व्यवसाय उभारला आहे. या व्यवसायातून त्यांना दररोज ₹40,000 कमाई होते. सुरुवातीला निव्वळ छंद म्हणून जितूने मश्रूमची शेती करण्यास सुरुवात केली होती. कालांतराने केवळ छंद म्हणून उभी केलेल्या शेतीने मोठ्या व्यवसायाचे रूप घेतले आहे.
जितू आणि त्याची आई लीना यांनी ५ हजार चौरस फूट जागेत मशरूम फार्म तयार केला आहे, जिथे दररोज 100 किलोहून अधिक मशरूम उत्पादन घेतले जाते. तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी साध्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला आहे. बिचौलियांशिवाय थेट किरकोळ विक्रेत्यांना मशरूम विकून ते चांगला नफा कमवत आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवसायात विकसित तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा केला आहे. 2018 मध्ये जीतू यांनी आपल्या खोलीत लहानसा प्रयोग म्हणून मशरूम उगवायला सुरुवात केली होती. इंटरनेटवर प्लास्टिकच्या बाटलीत मशरूम उगवण्याची पद्धत पाहून त्यांना ही कल्पना सुचली. हळूहळू त्यांचा छंद व्यवसायात बदलला. आज त्यांची ‘लीनाज मशरूम’ नावाची कंपनी दररोज 100 किलोहून अधिक मशरूम उत्पादित करते.
मशरूमची शेती फायदेशीर आहे कारण ती जलद उगवता येते आणि कमी जागेत चांगले उत्पन्न मिळवून देते. मात्र, ही शेती सोपी नाही कारण मशरूम अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असतात. मशरूमच्या वाढीसाठी विशिष्ट तापमान, आर्द्रता आणि स्वच्छतेची आवश्यकता असते. यामध्ये जर तापमान थोडंसं कमी-जास्त झालं किंवा पीक कीटकांच्या आहारी गेलं, तर संपूर्ण पीक वाया जाऊ शकते. त्यामुळे मशरूमची शेती करताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. भारतामध्ये गेल्या काही वर्षांत मशरूमची मागणी झपाट्याने वाढली आहे.
त्यांच्या चविष्ट स्वादामुळे ते सूप, पिझ्झा, पास्ता आणि अनेक पदार्थांमध्ये वापरले जातात. केवळ खाद्यपदार्थांपुरताच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मशरूमची मागणी वाढत आहे. योग्य पद्धतीने मशरूम शेती केल्यास ती मोठा आर्थिक लाभ देऊ शकते. 19 व्या वर्षीच जीतू यांनी मशरूम शेतीत रस घेतला आणि एका पॅकेटमध्ये बीज लावून त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला हा केवळ एक प्रयोग होता, परंतु त्यांच्या मेहनतीने आणि धाडसाने त्याचा मोठ्या व्यवसायात रुपांतर झाले. त्यांच्या आई लीना यांच्या मदतीने त्यांनी केवळ व्यवसाय उभा केला नाही, तर शेतीतील एक आदर्श घडवला आणि यशाची शिखरे गाठली.