इंटेलनंतर आता 'या' कंपनीचाही कामगार कपातीचा निर्णय; 10 टक्के कर्मचाऱ्यांना फटका!
दोनच दिवसांपूर्वी इंटेल या कंपनीने 15,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. चालू 2024 या वर्षाच्या अखेरीस ही कामगार कपात होणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. अशातच आता डेल या संगणक व संगणकाशी निगडित इतर वस्तू उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपनीने 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कपातीमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांसह एकूण 12,000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
10 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना फटका
बिझनेस इनसाइडरच्या एका रिपोर्टनुसार, डेलने कर्मचाऱ्यांना एक मेमो पाठवला आहे. या मेमोद्वारे कंपनीने लेऑफ विषयीची माहिती दिली आहे. सेल्स टीममध्ये बदल करण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती त्यात देण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (एआय) वर आधारित सेल्स युनिट तयार केले जाणार आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांना कमी करुन एआय आधारित गोष्टी कंपनीत सुरु करायच्या आहेत. मात्र, कंपनीने किती कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार, याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. परंतु, 10 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना याचा फटका बसेल, असे सांगितले जात आहे.
ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन स्कीम
डेल कंपनीने ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन अपडेट या नावाखाली कर्मचाऱ्यांना मेमो पाठवला आहे. कंपनीच्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी ग्लोबल सेल्स मॉडर्नायझेशन स्कीमचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. पुनर्रचना व्यवस्थापन तसेच गुंतवणुकीचे प्राधान्यक्रमही बदलत आहेत. कंपनीच्या विक्रीच्या धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
2023 मध्येही 13,000 कर्मचारी काढले होते
डेल कंपनीमध्ये 2023 मध्ये 13,000 कंर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता डेलमधून तितक्याच प्रमाणात नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. त्या वर्षी जगभरात मंदी आल्याने तंत्रज्ञान क्षेत्रातल्या जवळपास 1,20,000 नोकऱ्या गेल्या होत्या. दरम्यान, यापुढेही अनेक कंपन्यांचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार आहे. आयटी कंपन्या यात आघाडीवर आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.