सुशिक्षित तरुणाची कमाल, सेंद्रिय शेतीतून करतोय वर्षाला ७० लाखांची कमाई!
सध्याच्या घडीला राज्यासह देशभरात अनेक सुशिक्षित तरुण शेती तसेच शेती आधारित उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे या तरुणांना आपल्या ज्ञान आणि शिक्षणाच्या जोरावर यात मोठे यश देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकरी उद्योजकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपली प्रगती साधली आहे. त्याने सेंद्रिय शेतीआधारीत कंपनी स्थापन केली असून, तो त्या माध्यमातून वार्षिक ७० लाख रुपये इतकी कमाई करत आहे.
सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा पुढाकार
भावेश पुरोहित असे या शेतकरी उद्योजकाचे नाव असून, तो गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपले शिक्षण पुर्ण झाल्यानंतर भावेश याने शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने शेतीमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा पुढाकार घेतला. त्याने 2017 मध्ये ‘धेनू प्रसाद’ नावाची कंपनी सुरू केली. ही कंपनी गोमूत्रापासून नैसर्गिक खते बनवते. आज ही कंपनी वार्षिक 70 लाख रुपये इतका टर्नओव्हर करत आहे.
कशी सुचली कल्पना
सुरुवातीला भावेश याने बनासकांठा जिल्ह्यातील भाभर येथे ‘धेनू प्रसाद’ नावाने रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्रापासून बनवलेल्या नैसर्गिक खते व किटकनाशकांचा प्रचार सुरु केला. भावेश पुरोहित यांनी 2017 मध्ये ही कंपनी सुरू केली. तो याच जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. तो निराधार गायींना सांभाळत हा व्यवसाय करत आहे. निराधार गायी सांभाळत शेतकऱ्यांना त्यांचा फायदा व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यातून त्याच्या गोमूत्राचे 100 टक्के नैसर्गिक खतामध्ये रूपांतर करण्याची कल्पना धेनू प्रसादच्या माध्यमातून त्याच्या मनात आली.
जागरूकतेसाठी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा केल्या आयोजित
जवळपास तीन वर्ष संशोधन केल्यानंतर, भावेशने आपले स्टार्टअप गोमूत्र खत उद्योग यशस्वीपणे सुरू केला. भावेश पुरोहित याने तयार केलेले सेंद्रिय खते ही दररोज आजूबाजूच्या गावात आणि शेतात जात असत. मात्र, त्यांना फारशी मागणी मिळत नसे. ज्यामुळे त्याने गोमूत्र खताच्या फायद्यांविषयी जागरूक करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या. ज्यामुळे शेतकऱ्यांना गोमूत्र खताबाबत माहिती मिळण्यास मदत झाली.
दरमहा ४५,००० लिटर गोमूत्रावर प्रक्रिया
भावेशच्या याच प्रयत्नातून आज ‘धेनू प्रसाद’ ही गोमूत्र डेअरी म्हणून उद्याला आली आहे. त्यांच्या कंपनीच्या माध्यामातून 500 हून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास मदत होत आहे. कंपनी दरमहा ४५,००० लिटर गोमूत्रावर प्रक्रिया करते. ही खते नैसर्गिक कीटकनाशक आणि खते म्हणून उपलब्ध आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 70 लाख रुपये इतका होता. सध्या कंपनी आपल्या कार्याचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. आगामी काळात दररोज 10,000 लिटर्सवर प्रक्रिया करून, उत्पादनांचा विस्तार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.