फोटो सौजन्य - Social Media
जागतिक जल दिनानिमित्त, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप (GEG) ने जलसंवर्धनासाठी नवा उपक्रम राबवून शाश्वततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हिमनद्या वितळण्यास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायू उत्सर्जनाला आळा घालणे आणि जलसंपत्तीचे जतन करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औद्योगिक क्षेत्राच्या जबाबदारीची जाणीव ठेवत, गोदरेजने पाणी पुनर्वापर, पावसाचे पाणी संकलन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाद्वारे या समस्येला हात घालण्याचा संकल्प केला आहे.
गोदरेजच्या एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलीटी प्रमुख तेजश्री जोशी म्हणतात, “पाणी ही समाज आणि अर्थव्यवस्थेची जीवनरेखा आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन हे केवळ पर्यावरणपूरक नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक गरजही आहे. आम्ही नवकल्पक जलसंवर्धन धोरणे राबवून पाण्याचा सुयोग्य वापर सुनिश्चित करत आहोत. यामुळे पर्यावरणासोबतच संपूर्ण समाजाचा विकास होईल.” 2010-11 पासून, गोदरेजने आपल्या संपूर्ण उद्योग प्रक्रियेत पाण्याचा वापर 50% पेक्षा अधिक घटवला आहे. कंपनीने आपल्या सर्व सुविधांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे जमिनीखालील जलसाठे पुनर्भरण शक्य होत आहे. मुंबईतील विक्रोळी कॅम्पसची वार्षिक पाण्याची साठवणूक क्षमता 4,25,000 घनमीटरपेक्षा अधिक आहे.
पाणी पुनर्वापराच्या दिशेनेही कंपनीने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. 2010-11 पासून, गोदरेजने 20 अब्ज लिटरपेक्षा जास्त सांडपाणी आणि पावसाचे पाणी पुनर्वापरित केले आहे. जलसंकटाने ग्रस्त भागांमध्ये ही योजना विशेष लाभदायक ठरली आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडूमधील ग्रामीण भागांमध्ये 100 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीपुरवठा करण्यात आला आहे. स्थानिक समुदायांशी सहकार्य करत कंपनी तलाव पुनर्भरण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि शेतीस मदत करणारे उपक्रम राबवत आहे.
गोदरेजच्या शाश्वततेच्या धोरणांमध्ये ऊर्जा बचत आणि हरित गृहनिर्माण यांचाही समावेश आहे. कंपनीने 320 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर 650 हून अधिक ग्रीन बिल्डिंग्स उभारल्या आहेत, ज्यामुळे दरवर्षी 610,000 MWh पेक्षा अधिक ऊर्जेची बचत होते. तसेच, विक्रोळीतील खारफुटी जंगल दरवर्षी 60,000 टन कार्बन डायऑक्साइड साठवते. 2032 पर्यंत जलसंवर्धनाची क्षमता दुप्पट करणे आणि कार्बन उत्सर्जन 60% ने घटवणे, ही गोदरेजची महत्त्वाकांक्षी योजना आहे. भारताला भेडसावणाऱ्या पाण्याच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी, जल संवर्धनासह सरकारी आणि औद्योगिक सहकार्य अनिवार्य आहे. गोदरेजचा हा उपक्रम शाश्वततेच्या दिशेने एक आदर्श पाऊल आहे.