
रुपयाच्या घसरणीचा मनोरंजनाला देखील फटका! जानेवारीपासून एलईडी टीव्हीच्या किंमती वाढण्याची शक्यता
Television Price News: रुपयाने अलीकडेच पहिल्यांदाच ९० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. रुपयाच्या घसरणीने उद्योगाला असुरक्षित स्थितीत आणले आहे. या घसरणीचा विपरीत परिणाम सेमीकंडक्टर इंडस्ट्रीवर होत आहे. मेमरी चिपच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे पुढील वर्षी जानेवारीपासून टेलिव्हिजनच्या किमती तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतात. कारण एलईडी टीव्हीमध्ये देशांतर्गत मूल्यवर्धन फक्त ३० टक्के आहे आणि ओपन सेल्स, सेमीकंडक्टर चिप्स आणि मदरबोर्डसारखे प्रमुख घटक आयात केले जातात.
मेमरी चिपच्या संकटामुळे ही समस्या आणखी वाढली आहे, जिथे एआय सर्व्हरसाठी हाय-बैंडविड्थ मेमरी (एचबीएम) ची मोठी मागणी तीव्र जागतिक टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे सर्व प्रकारच्या मेमरीच्या (डीआरएएम, फ्लॅश) किमती गगनाला भिडल्या आहेत. चिप उत्पादक उच्च-नफा असलेल्या एआय चिप्सवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामुळे टीव्हीसारख्या पारंपारिक उपकरणांचा पुरवठा कमी होत आहे.
हायर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष एन एस सतीश यांनी सांगितले की मेमरी चिपची कमतरता आणि कमकुवत रुपयामुळे एलईडी टीव्ही सेटच्या किमती तीन टक्क्यांनी वाढतील. काही टीव्ही उत्पादकांनी त्यांच्या डीलर्सना संभाव्य किमती वाढीबद्दल आधीच माहिती दिली आहे. टीव्ही उत्पादक कंपनी सुपर प्लास्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (एसपीपीएल) म्हणाली, “गेल्या तीन महिन्यांत मेमरी चिपच्या किमती ५०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. एसपीपीएलचे अवनीत सिंग मारवाह यांच्या मते, मेमरी चिप संकट आणि रुपयाच्या अवमूल्यनाच्या परिणामामुळे टेलिव्हिजनच्या किमती सात ते १० टक्क्यांनी वाढ शकतात.
हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजारात आज ‘रेड’ अलर्ट? कमकुवत सुरुवातीची शक्यता, गुंतवणूकदारांनो सावध राहा
AI मुळे बिघडला मेमरी चिपचा बॅलन्स
टीव्हीच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण जागतिक मेमरी चिप संकट असून यामुळे ग्राहकांना आर्थिक फटका बसू शकतो. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे AI सर्व्हरसाठी लागणारी उच्च-बँडविड्थ मेमरीची अधिक मागणी बाजारात डीआरएएम आणि फ्लॅश मेमरीची तीव्र कमतरता निर्माण करत आहे. यामुळे एआय चिप्सवर चिपमेकर्स अधिक लक्ष केंद्रित करत आहेत, त्याचा थेट परिणाम टीव्हीसारख्या पारंपारिक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर होऊन पुरवठा कमी झाला आहे आणि किंमती झपाट्याने वाढत आहेत.