13 शेतकऱ्यांनी घेतली खासदार पदाची शपथ!
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (बीजेपी) देखील याचा अनुभव घेतला. बीजेपीला बहुमतापासून दूर ठेवण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा असल्याचे, निकालानंतर अनेक विश्लेषकांनी म्हटले आहे. अशातच आता 18 व्या लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांमध्ये देखील शेतकरी खासदारांचा वरचष्मा पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक सदस्य शेती व्यवसायाशी संबंधित
2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण १३ शेतकरी हे निवड होऊन लोकसभेत पोहचले. लोकसभा सचिवालयाच्या माहितीनुसार, एकूण 543 सदस्य संख्येपैकी 148 सदस्यांनी आपला व्यवसाय शेती असल्याचे नमूद केले आहे. तर १३ हे खासदार हे प्रत्यक्ष शेतकरी असल्याचे समोर आले आहे. अर्थात आकडेवारीनुसार, यावेळच्या लोकसभेमध्ये शेतीची पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांची संख्या ही सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे.
४ खासदार १० वीही पास नाही
१८ व्या लोकसभेत नव्याने निवडून आलेल्या खासदारांना आज शपथ देण्यात आली आहे. यामध्ये खासदारांच्या व्यवसायाची देखील माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ४ खासदार हे १० वी उत्तीर्ण नसल्याचे देखील समोर आले आहे. तर 316 खासदारांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. दरम्यान, नवनिर्वाचित खासदारांच्या व्यवसायाबाबत बोलायचे झाले तर 18 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांपैकी 76 खासदारांनी आपला व्यवसाय ‘बिझनेस’ म्हणून नमूद केला आहे.
कोण आहेत सर्वात तरुण आणि वयस्कर खासदार?
याशिवाय 58 समाजसेवक, 32 वकील आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, यासोबतच 7 डॉक्टर, 4 अभियंते, एक चित्रपट कलाकार, एक रणनीती सल्लागार आणि एक निवृत्त आयएएस अधिकारी यांनी देखील खासदारपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, 18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या खासदारांमध्ये सर्वात वयस्कर खासदार म्हणून डीएमकेचे टीआर बालू यांनी शपथ घेतली आहे. जे सध्या 83 वर्षांचे आहेत. तसेच सर्वात तरुण खासदाराचा मान सपाचे पुष्पेंद्र सरोज यांना मिळाला आहे. ते वयाच्या 25 व्या वर्षी लोकसभेत पोहोचले आहेत.