भारतीय स्मार्टफोन बाजारात सॅमसंगचा डंका; नामवंत कंपन्यांना पिछाडी देत पहिल्या स्थानी झेप!
भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. यावर्षी दुसऱ्या तिमाहीत पहिल्या क्रमांकावर असलेली शाओमी मोबाईल कंपनी तिसऱ्या तिमाहीत पाचव्या स्थानावर घसरली आहे. तर मागील अहवालात तिसऱ्या क्रमांकावर असलेली सॅमसंग मोबाईल कंपनी पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. काउंटर पॉइंट रिसर्चच्या ताज्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
सॅमसंगची मोठी झेप
सॅमसंग या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी झेप घेतली आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनी बाजारातील हिस्साच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर आता तिसऱ्या तिमाहीत कंपनीने थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. सॅमसंग ही दक्षिण कोरियन कंपनी आहे. यानंतर दुसऱ्या स्थानावर ॲपल या कंपनीचा क्रमांक लागतो. भारतीय स्मार्टफोन बाजारात व्हिवो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या स्थानावर असलेली शाओमी यावेळी पाचव्या स्थानावर फेकली गेली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
स्मार्टफोन मार्केटमध्ये विक्रमी वाढ
काउंटर पॉईंट रिसर्चने बुधवारी (ता.३०) या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर 2024 दरम्यानच्या भारतातील स्मार्टफोन विक्रीचा डेटा जाहीर केला. या अहवालानुसार, या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन मार्केटमध्ये वार्षिक आधारावर विक्रमी १२ टक्के वाढ झाली आहे. कोणत्याही एका तिमाहीतील ही सर्वाधिक वाढ आहे. एवढेच नाही तर या काळात स्मार्टफोनच्या शिपमेंटमध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सॅमसंग पहिल्या स्थानावर
काउंटर पॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार, सॅमसंगचा तिसऱ्या तिमाहीत मूल्याच्या आधारावर 22.8 टक्के बाजार हिस्सा होता. यासह कंपनी आता भारतीय बाजारात अव्वल स्थानावर पोहोचली आहे. याच्या एक चतुर्थांश आधी, कंपनी 18.1 टक्के मार्केट शेअरसह तिसऱ्या स्थानावर होती. तिसऱ्या तिमाहीत ॲपल 21.6 टक्के शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ॲपल पाचव्या स्थानावरही नव्हते. तिसऱ्या तिमाहीत, व्हिवो 15.5 टक्के मार्केट शेअरसह तिसरे, तर ओप्पो 10.8 टक्के मार्केट शेअरसह चौथ्या स्थानावर आहे.
हे देखील वाचा – भारतातील नोकरदारवर्ग अडकतोय कर्जाच्या विळख्यात, अहवालातून धक्कादायक वास्तव समोर!
स्मार्टफोनमध्ये 5G चा महिमा
तिसऱ्या तिमाहीत 5जी स्मार्टफोनने सर्वांनाच मात दिली आहे. 5जी स्मार्टफोन सेवेने एकूण शिपमेंटमध्ये 81 टक्के हा आतापर्यंतचा सर्वाधिक हिस्सा गाठला आहे. काउंटर पॉईंटचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक प्रचीर सिंग म्हणाले आहे की, “प्रिमियम ट्रेंडशी निगडीत, बाजार वेगवान किंमतीच्या वाढीकडे वाटचाल करत आहे. आकर्षक ईएमआय ऑफर आणि ट्रेड-इनमुळे बाजाराला पाठिंबा मिळत आहे.”