इंडिगोचा अजब कारनामा, 45 हजारांचे सामान हरवले; प्रवाशाच्या हातावर टेकवली 2450 रुपये भरपाई!
आपल्यापैकी बरेच जण प्रवास करताना, मोठ्या प्रमाणात सामान घेऊन प्रवास करत असतात. त्यामुळे अनेकदा सामानाची चोरी होणे किंवा सामान हरवणे असे प्रकार घडतात. विशेषत ट्रेन किंवा विमान प्रवासादरम्यान अशा घटना अधिक घडतात. मात्र, विमान प्रवास करताना तुमचे सामान हरवले. जे तब्बल ४५ हजार रुपये किमतीचे आहे. त्यानंतर तुम्ही विमान कंपनीकडे तक्रार केली. आणि संबंधित विमान कंपनीने तुम्हांला 2450 रुपयांची नाममात्र भरपाई दिली तर तुमचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही? असाच काहीसा प्रकार इंडिगोच्या एका प्रवाशासोबत घडला. त्यानंतर त्याने समाजमाध्यमावर आपली व्यथा मांडली आहे.
काय आहे संपुर्ण प्रकरण?
मोनिक शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून, इंडिगोच्या फ्लाइटमध्ये त्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. याबाबत मोनिक यांच्या मित्राने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत प्रकरण समोर आणले आहे. एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझा मित्र @nik1220 (मोनिक शर्मा) @IndiGo6E या कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान डोमेस्टिक फ्लाइटने प्रवास करत होता. त्याने कोलकाता-गुवाहाटी फ्लाइटमध्ये चढताना इंडिगोकडे आपले सामान सुपुर्द केले होते. मात्र, त्याचे हे सामान इंडिगोमार्फत गुवाहाटीपर्यंत पोहोचलेच नाही. असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Every day you learn how the system can mess you up in a new way. @IndiGo6E lost my friend’s @nik1220‘s baggage on a domestic flight (Kolkata-Guwahati).
The bag had stuff worth 45k in it along with important papers like Driving License, PAN, Aadhar, etc.
It was checked in at… pic.twitter.com/L54ZUtOpHr
— Ravi Handa (@ravihanda) August 24, 2024
काय सामान होते मोनिक शर्मा यांच्या बॅगेत?
मोनिक शर्मा यांच्या बॅगमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी महत्त्वाच्या कागदपत्रांसह ४५ हजार रुपयांच्या वस्तू होत्या. कथित बोर्डिंग पासवरील तारखेनुसार ही घटना या वर्षी जुलैमध्ये घडली होती. त्यानंतर मोनिक शर्मा यांनी इंडिगोकडे नुकसान भरपाई मागितली होती. त्यानुसार घटनेच्या एका महिन्यानंतर, इंडिगोने प्रवाशाला मोनिक शर्मा यांना ४५ हजाराच्या बदल्यात, केवळ 2,450 रुपयांची भरपाई दिली आहे. या प्रकरणाची हास्यास्पद म्हणून सध्या समाजमाध्यमांवर चर्चा होत आहे.
यापुर्वी घडले होते असेच प्रकरण
देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी इंडिगोकडे सामानाच्या वाहतुकीसाठी बॅगेज डिलेड अॅन्ड लॉस्ट प्रोटेक्शन सर्विस कार्यरत आहे. या सेवेच्या माध्यमातून देशांतर्गत प्रवासासाठी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान निश्चित शुल्क आकारणी केली जाते. मग त्यात कोणतेही सामान असेल तरीही हे शुल्क आकारले जाते. यावर्षीच्या सुरुवातीला देखील इंडिगोच्या या सेवेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यावेळी कंपनीला याप्रकरणी माफी मागावी लागली होती. तर ग्राहकाच्या झालेल्या असुविधेबाबत कंपनीने खेद व्यक्त केला होता.