'हे' राज्य सोसतंय महागाईची सर्वाधिक झळ; झारखंडमध्ये सर्वात कमी महागाई, वाचा... महाराष्ट्रातील परिस्थिती
देशातील किरकोळ महागाईचा दर जुलैमध्ये 3.54 टक्के या पाच वर्षांच्या निच्चांकी पातळीवर आला आहे. याआधी जूनमध्ये महागाईचा दर ५.१ टक्के होता. ज्यामुळे सध्या सामान्यांना महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, असे असतानाच देशभरातील महागाईची परिस्थीती ही राज्यनिहाय वेगवेगळी आहे. जुलै महिन्यातील महागाईच्या नवीन आकडेवारीनुसार, बिहारमधील जनतेला महागाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. यानंतर आसामची जनता ही भार झेलत आहे. महागाईने सर्वाधिक फटका बसलेल्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचाही समावेश आहे.
बिहारमधील लोक महागाईने सर्वाधिक त्रस्त
जुलै महिन्यातील महागाईच्या नवीन आकडेवारीनुसार, बिहारमधील लोक महागाईने सर्वाधिक त्रस्त आहेत. त्या ठिकाणी जुलैमध्ये सर्वाधिक ५.९ टक्के महागाई दर नोंदवला गेला आहे. आसाम या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून. तेथील नागरिकांना देखील महागाईचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. आसाममध्ये गेल्या महिन्यात महागाईचा दर ५.१ टक्के इतका नोंदवला गेला आहे. पूर्व किनारपट्टीवरील राज्य ओडीसा हे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्या ठिकाणी 4.8 टक्के महागाई नोंदवण्यात आली आहे.
(फोटो सौजन्य – istock)
20 राज्यांमध्ये महागाईचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी
देशातील उर्वरित 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी ज्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 20 राज्यांमध्ये महागाईचा दर हा 5 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला आहे. महागाई कमी असलेल्या राज्यांची यादी पाहिल्यास, बिहारपासून वेगळे झालेल्या झारखंडमध्ये परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. झारखंडमध्ये महागाई दर सर्वात कमी 1.7 टक्के इतका आहे. सर्वात कमी महागाई दराच्या बाबतीत झारखंडनंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. त्या ठिकाणी महागाई दर 2.1 टक्के इतका आहे.
मागासलेल्या राज्यांना महागाईचा सर्वाधिक फटका
त्यानंतर छत्तीसगडमध्ये महागाई दर 2.2 टक्के आहे. तर राजस्थानमध्ये महागाई दर 2.5 टक्के आणि उत्तराखंडमध्ये 2.8 टक्के आहे. त्यामुळे महागाईची आकडेवारी पाहता, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या राज्यांना महागाईचा सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. या राज्यांमध्ये अन्नधान्याचे चांगले उत्पादन होऊनही अन्नधान्य महागाई ही त्या ठिकाणची मोठी समस्या आहे. समाधानकारक बाब म्हणजे महाराष्ट्र आणि अन्य दक्षिणकडील राज्यांमध्ये महागाईचा दर हा 5 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवला गेला आहे.