
आयटीआर भरलाय? पडताळणीसाठी उरलेत फक्त 10 दिवस, वाचा... कधीपर्यंत आहे मुदत
आयकर विभागाकडून आयटीआर दाखल करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. या निहित मुदतीत अर्थात 31 जुलै 2024 पर्यंत सुमारे 7.28 कोटी करदात्यांकडून आयकर रिटर्न (आयटीआर) भरण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने २६ जुलैपर्यंत सुमारे ५ कोटी आयटीआर दाखल झाले होते. तर उर्वरित अंदाजे 2.28 कोटी आयटीआर 27 ते 31 जुलै या कालावधीत दाखल करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत आता २६ ते 31 जुलै दरम्यान दाखल झालेल्या आयटीआरच्या पडताळणीची तारिख 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. त्यामुळे या कालावधीत आयटीआर भरलेल्यांना आयटीआर पडताळणीसाठी केवळ दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. अन्यथा तुम्हांला आयकर परतावा मिळणार नाही. याशिवाय तुम्हांला दंडही भरावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी तात्काळ आयटीआर पडताळणी करून घेणे, गरजेचे असणार आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हेही वाचा – प्राध्यापक, सायंटिस्ट पदाची नोकरी सोडली; व्यवसायात उतरला, कमावतोय वर्षाला 2 कोटी रुपये!
30 दिवसांत पडताळणी आवश्यक
आयकर विभागाच्या नियमांनुसार, तुम्हाला आयटीआर दाखल केल्यानंतर 30 दिवसांचा कालावधीत ई-व्हेरिफिकेशन किंवा आयटीआर-5 ऑफलाइन सबमिट करणे आवश्यक असते. आयकर विभागाच्या माहितीनुसार, २० ऑगस्टपर्यंत एकूण ७,४१,३७,५९६ आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 7,09,89,014 आयटीआरची पडताळणी करण्यात आली आहे. अर्थात आतापर्यंत सुमारे 32 लाख करदात्यांची आयटीआर पडताळणी झालेली नाही. याशिवाय 31 जुलैपर्यंत आयटीआर दाखल केलेल्या, सुमारे 19 लाख करदात्यांनी अद्याप त्यांचा आयटीआर पडताळणी केलेला नाही.
कधीपर्यंत आहे पडताळणीसाठी मुदत
आयटीआर आणि ई-व्हेरिफिकेशन दाखल करण्यात 30 दिवसांपेक्षा जास्त अंतर नसावे, असा आयकर विभागाचा नियम आहे. तुमचा परतावा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही आयटीआर पडताळणी केली असेल. त्यामुळे आता तुम्ही तुमचा आयटीआर 31 जुलै रोजी भरला असेल, तर त्याची पडताळणी करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट असणार आहे. तुम्ही ही अंतिम मुदत चुकवली तर ती उशीरा फाइलिंग मानली जाईल. अशा परिस्थितीत तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे ३१ जुलैपुर्वी आयटीआर भरूनही तुमचा उपयोग होणार नाही. तुम्हांला एक हजार ते पाच हजार रुपये इतका कर भरावा लागू शकतो.