जन धन योजनेला 10 वर्ष पुर्ण, नेमकी किती खाती? किती पैसे? अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली माहिती
केंद्र सरकारने दहा वर्षापुर्वी अर्थात २८ ऑगस्ट २०१४ रोजी देशभरातील नागरिकांना बॅंकिंग सेवेशी जोडण्यासाठी पंतप्रधान जन धन योजना सुरु केली होती. त्यामुळे आता दहा वर्षानंतर या योजनेच्या माध्यमातून नेमकी किती खाती उघडण्यात आली आहेत. आणि त्यामध्ये नेमके किती पैसे जमा आहेत. याबाबतची माहिती देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे. याशिवाय सरकार या योजनेअंतर्गत आणखी ३ कोटी खाती उघडणार आहेत. असेही त्यांनी सांगितले आहे.
जन धन योजनेची 53 कोटी खाती
गेल्या दहा वर्षात देशभरात उघडण्यात आलेल्या पंतप्रधान जन धन योजनेच्या बॅंक खात्यांमध्ये सर्वाधिक खाती ही महिलांची आणि खेड्यात राहणाऱ्या नागरिकांची आहेत. सध्याच्या घडीला देशात 53 कोटी जन धन योजनेची खाती असून, त्यात एकूण 2.3 ट्रिलियन रुपये आहेत. या 53 कोटी जन धन खात्यांपैकी 80 टक्के खाती सक्रिय आहेत. याशिवाय केंद्र सरकार येत्या काळात या योजनेच्या माध्यमातून आणखी 3 कोटी नवीन खाती उघडणार आहेत. अशी माहितीही यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
(फोटो सौजन्य – PmIndia संकेतस्थळ)
हेही वाचा – ‘हा’ शेतकरी आहे एका ट्रेनचा मालक, अंबानी-अदानींना जमलं नाही ते पठ्ठयाने करुन दाखवलं!
निम्म्याहून अधिक खाती महिलांची
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट 2024 पर्यंत देशातील 53.11 कोटी जन धन खात्यांपैकी 55.6 टक्के अर्थात 29.53 कोटी खाती ही महिलांची आहेत. देशातील सुमारे 99.95 टक्के खेड्यांपासून 5 किमीच्या परिघात बँक शाखा, एटीएम, बँकिंग करस्पॉडंट आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यासह काही टचपॉईंटद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. देशात 1.73 अब्ज पेक्षा जास्त ऑपरेटिव्ह चालू खाती आणि बचत खाती आहेत. त्यापैकी 53 कोटींहून अधिक जन धन खाती आहेत. असेही त्या म्हणाल्या आहेत.
खातेधारकांना विविध योजनांचा मिळालाय लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 20 कोटी लोकांना 436 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात आला आहे. तसेच, सुमारे 45 कोटी लोकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 20 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देण्यात आला आहे. अटल पेन्शन योजनेत 6.8 कोटी लोकांचाही सहभाग आहे. स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 53,609 कोटी रुपयांची 236,000 कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. 65 लाखांहून अधिक पथ विक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून 12,630 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.