भारतीय कंपन्यांचा जगभरात डंका; जेएसडब्ल्यूने खरेदी केली ऑस्ट्रेलियाची 'ही' कंपनी!
भारतीय कंपन्या जगभरात आपला डंका गाजवत आहे. नुकतीच भारती एंटरप्रायझेसने ब्रिटनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बीटी समुहामधील मोठा हिस्सा खरेदी करून, टाटा-महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांच्या यादीत स्थान निर्माण केले आहे. अशातच आता देशातील आघाडीची कंपनी जेएसडब्लू स्टीलने ‘एम रेस एनएसडब्ल्यू’ (M Res NSW) ही ऑस्ट्रेलियाची मोठी खाण कंपनी विकत घेतल्याचे समोर आले आहे. हे जेएसडब्ल्यूचे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे आता कंपनीला यापुढे कच्च्या मालाची कोणतीही अडचण येणार नाही.
66.67 टक्के हिस्सा घेतला विकत
सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्लू स्टील ही कंपनी वेगाने विस्तारत आहे. कंपनीने हा करार तिच्या उपकंपनी जेएसडब्लू स्टील नेदरलँडच्या माध्यमातून केला आहे. कंपनीने ‘एम रेस एनएसडब्ल्यू’ (M Race NSW) मधील 66.67 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. जेएसडब्लू स्टीलच्या संचालक मंडळाने 12 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत ‘एम रेस एनएसडब्ल्यू’च्या अधिग्रहणास मान्यता दिली आहे, असे कंपनीकडून शेअर बाजारातील एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगण्यात आले आहे. जेएसडब्लू स्टील नेदरलँड्सने हा करार 120 दशलक्ष डॉलरमध्ये केला आहे.
हेही वाचा : ‘ही’ भारतीय कंपनी करणार ब्रिटिश कंपनीसोबत 33,578 कोटींचा करार; शेअर्सवर दिसणार परिणाम!
50 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करावी लागणार
जेएसडब्ल्यू स्टीलने या खरेदी कराराबाबत सांगितले आहे की, कच्चा माल सुरक्षित करणे आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हे अधिग्रहण करण्यात आले आहे. अटींनुसार, जेएसडब्ल्यू स्टीलला ‘एम रेस एनएसडब्ल्यू’मध्ये 50 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करावी लागणार आहे. अलीकडे जेएसडब्ल्यू स्टीलने मोझांबिकमध्ये कोळसा खाण प्रकल्प चालवणारी मिनास डी रेवुबो लिमिटाडा (Minas de Revuboe Limitada) कंपनी देखील विकत घेतली होती. जेएसडब्ल्यू स्टीलने 2030 पर्यंत 50 दशलक्ष टन स्टील उत्पादन क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
काय करते एम रेस एनएसडब्ल्यू कंपनी?
एम रेस एनएसडब्ल्यू मॅथ्यू लॅटिमोर यांच्या मालकीची आहे. ते एम रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. ही एक खाणकाम, गुंतवणूक, विपणन आणि ट्रेडिंग कंपनी आहे. तिचे मुख्यालय ऑस्ट्रेलियात आहे. एम रेस एनएसडब्ल्यूचा गोल्डन M NSW Pty Ltd मध्ये 30 टक्के हिस्सा आहे. त्यांच्या खाणी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये आहेत. या खाणींमध्ये 99 दशलक्ष टन प्राइम हार्ड कोकिंग कोळशाचा साठा आहे.