
मदर डेअरीकडून मुंबईतील ग्राहकांसाठी शुद्ध 'म्हशीचे दूध' लॉन्च
राज्यात सध्याच्या घडीला अनेक दूध ब्रँडच्या माध्यमातून दूध वितरण केले जाते. प्रत्येकाची आपली एक वेगळी विशेषतः असून, त्यानुसार त्यांच्यासोबत ग्राहक जोडले गेले आहे. अशातच आता मदर डेअरीने मुंबई विभागातील आपल्या ग्राहकांसाठी ‘शुद्ध म्हशीचे दूध’ लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे हा दूध प्रकार ग्राहकांच्या मागणीनुसार विकसित करण्यात आला आहे. डेअरीच्या हा दूध प्रकार विशिष्ट वर्गातील ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे. मुंबई विभागातील ग्राहकांना मदर डेअरीचे हे ‘शुद्ध म्हशीचे दूध’ आजपासून उपलब्ध झाले आहे.
6.5 टक्के फॅट, 9 टक्के एसएनएफसह उपलब्ध
मदर डेअरीचे हे म्हशीचे दूध मलईदार आणि ए2 प्रोटीनसह उच्च फॅट आणि एसएनएफ प्रकारात उपलब्ध आहे. या दुधामध्ये प्रामुख्याने 6.5 टक्के फॅट आणि 9 टक्के एसएनएफ असणार आहे. हे दूध 500 मिली आणि 1 लिटरच्या नेहमीच्या पॅकमध्ये उपलब्ध असणार आहे. टप्प्याटप्प्याने हे दूध सर्व ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेलवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आता हे दूध नियमित सेवनासह स्वयंपाक घरातील पदार्थांसाठी देखील उपयुक्त असणार आहे.
किती आहे शुद्ध म्हशीच्या दुधाचा दर?
मदर डेअरीने आपल्या ग्राहकांना हे शुद्ध म्हशीचे दूध प्रामुख्याने 500 मिली अर्थात अर्धा लिटर आणि 1 लिटर पॅकेटमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये ग्राहकांना हे शुद्ध म्हशीच्या एक लिटर दुधासाठी 72 रुपये मोजावे लागणार आहेत. 72 रुपयांना मिळणारे हे एक लिटरचे पॅकेट 6.5 टक्के फॅट आणि 9 टक्के एसएनएफमध्ये उपलब्ध असणार आहे.
ग्राहकांच्या पसंतीस उतरणार?
मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री मनीष बंदलीश यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की, “मदर डेअरीकडून वितरित होणाऱ्या सर्व बाबी या प्रामुख्याने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेऊन तयार करण्यात आल्या आहेत. मागील ५ दशकांपासून मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीतून कंपनी आपले प्रॉडक्ट ग्राहकांच्या सेवेत आणत आहे. अशातच आत नव्याने लॉन्च करण्यात आलेले शुद्ध म्हशीचे दूध हे देखील ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करण्यात आले आहे. मदर डेअरीला आशा आहे की, लवकरच आपला हा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.”
टप्प्याटप्प्याने सर्वत्र उपलब्ध होणार
दरम्यान, मदर डेअरी नव्याने बाजारात आणलेले आपले शुद्ध म्हशीचे दूध लवकरच टप्प्याटप्याने सर्व भागांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे दूध कंपनीच्या संपूर्ण वितरण नेटवर्कवर ऑफलाइन आणि ऑनलाइन चॅनेलसह सर्वत्र उपलब्ध केले जाईल. मुंबई विभागामध्ये मदर डेअरीकडे आधीच 05 दुधाच्या प्रकारांचा मजबूत पोर्टफोलिओ आहे. ज्यात आईस्क्रीम, दही, दुग्धजन्य पेये यांसारख्या स्वादिष्ट डेअरी उत्पादनांच्या श्रेणीशिवाय गायीचे दूध, फुल क्रीम मिल्क, टोन्ड मिल्क, डबल टोन्ड मिल्क, पनीर इत्यादींचा समावेश आहे.