इलेक्ट्रिक वाहनांबाबत नितीन गडकरींचे मोठे विधान; चीनला देणार धोबीपछाड!
जगभरातील सर्व देश सध्या हळूहळू आपली वाहतूक ई-वाहनांकडे (ईव्ही) वळवत आहेत. भारतही या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या वाढीमध्ये लिथियम सर्वात महत्वाची भूमिका बजावते. जो एक नॉन-फेरस धातू आहे. ज्याचा वापर मोबाईल आणि लॅपटॉपसह इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्ज करण्यायोग्य बॅटरी बनवण्यासाठी केला जातो. आतापर्यंत भारत हा लिथियमसाठी इतर देशांवर अवलंबून होता. परंतु, आता याबाबत लवकरच चित्र बदलणार आहे. असे खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. भारत लवकरच लिथियम आयन बॅटरी निर्यात करण्याच्या स्थितीत असेल. असे त्यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे.
ईव्ही फायनान्स मार्केट 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढणार
मंगळवारी (ता.१०) सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 64 व्या परिषदेत ते बोलत होते. सध्याच्या घडीला देशात इलेक्ट्रिक वाहने वाढण्याचे आकडे उत्साहवर्धक आहेत. हाच वेग कायम राहिल्यास 2030 पर्यंत ईव्ही मार्केटमध्ये 1 कोटी रुपयांची विक्रमी विक्री होईल. ईव्ही फायनान्स मार्केट 5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले आहे.
हे देखील वाचा – घरे खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी; एनबीसीसी सुपरटेकचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार!
गेल्याच आठवड्यात ब्लूमबर्ग इव्हेंटमध्ये ते म्हणाले होते की, लिथियम-आयन बॅटरीची किंमत, जी प्रति किलोवॅट तास 150 डॉलर होती. ती आता 107-108 डॉलर प्रति किलोवॅट तासांपर्यंत खाली आहे. याशिवाय देशातील पाच कंपन्यांनी लिथियम-आयन बॅटरीचे उत्पादन सुरू केले आहे. येत्या काही वर्षांत त्याची किंमत प्रति किलोवॅट तास 90 डॉलरपर्यंत खाली येईल. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती.
लिथियम आयन बॅटरी मार्केटमध्ये चीनचे वर्चस्व
लिथियम आयन बॅटरी मार्केटमध्ये चीनचे वर्चस्व आहे. जगभरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक 10 लिथियम बॅटरीपैकी 4 चीनमध्ये वापरल्या जातात. याशिवाय चीन लिथियम बॅटरींच्या उत्पादनातही इतर देशांपेक्षा पुढे आहे. लिथियम बॅटरीच्या जगातील एकूण उत्पादनात चीनचा वाटा ७७ टक्के इतका आहे. भारतात बहुतेक लिथियम बॅटरी चीन आणि हाँगकाँगमधून आयात केल्या जातात.
2020-21 या आर्थिक वर्षात भारताने लिथियम आयन बॅटरीच्या आयातीवर 8,984 कोटी रुपये खर्च केले होते. 2021-22 मध्ये भारताने 13,838 कोटी रुपयांच्या लिथियम आयन बॅटऱ्या आयात केल्या होत्या. परंतु आता त्यांचे उत्पादन देशातच सुरू झाले आहे. इतकेच नाही तर भारतात लिथियमचा मोठा साठाही सापडला आहे.