
New nuclear power projects of up to 1,600 MW across the country
NTPC Nuclear Project: सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीने देशातील विविध ठिकाणी ७०० मेगावॅट, १,००० मेगावॅट आणि १,६०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची मोठी योजना आखली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. एनटीपीसीचे लक्ष्य २०४७ पर्यंत भारताच्या प्रस्तावित १०० गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेत ३० गिगावॅट म्हणजेच ३० टक्के योगदान देण्याचे आहे. उद्योगातील अंदाजानुसार, १ गिगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १५,००० ते २०,००० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो आणि बांधकाम ते उत्पादन या प्रक्रियेला साधारण तीन वर्षांचा कालावधी लागतो.
सध्या एनटीपीसी गुजरात, मध्य प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेशासह अनेक राज्यांमध्ये योग्य भूखंडांच्या पर्यायांचा अभ्यास करत आहे. कंपनीच्या रणनीतीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्पांची क्षमता ७००, १,००० आणि १,६०० मेगावॅट अशी असेल. अणुऊर्जा नियामक मंडळ (एईआरबी) यांनी मंजूर केलेल्या राज्यांमध्येच प्रकल्प उभारले जाणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर एनटीपीसी तरतुदीनुसार प्रकल्प राबवणार आहे. अणुऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरही कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत.
या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर परदेशातील युरेनियम खाणींमध्ये गुंतवणुकीच्या शक्यतांचा कंपनी अभ्यास करत आहे. यासाठी यूरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडशी (यूसीआयएल) तांत्रिक व व्यावसायिक तपासणीसाठी सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. यानुसार पुढील आखणी करण्यात येणार आहे.
स्वदेशी रिएक्टर तंत्रज्ञानावर भर
तंत्रज्ञानाच्या आघाडीवर, कंपनी स्वदेशी दाब युक्त भारी जल रिएक्टर तंत्रज्ञानावर आधारित ७०० व १,००० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारणार आहे, तर १,६०० मेगावॅट प्रकल्पांसाठी तांत्रिक सहकार्याचा विचार केला जाईल. सध्या एनटीपीसीची एकूण स्थापित क्षमता ८४,८४८ मेगावॅट असून राजस्थानमध्ये एनपीसीआयएलसोबत संयुक्तपणे सुमारे ४२,००० कोटी रुपयांचा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे.
भारत देशात सध्या 7 अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये 25 अणुभट्ट्या कार्यरत आहेत. ज्यांची एकूण क्षमता 8880 मेगावॅट आहेत. या अणुभट्ट्यांचे संचालन न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) द्वारे केले जाते.