गेले काही दिवस बाजारात कांद्याचे दर काहीसे स्थिर असल्याचे दिसून आले होते. मात्र, आता राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. राज्यात सध्या कांद्याचे दर किरकोळ बाजारात ८० रुपये प्रति किलोपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे आठवडाभरातच राज्यातील कांद्याचे दर हे तब्बल ३० ते ३५ टक्क्यांनी वाढले आहेत. प्रामुख्याने बाजारात उन्हाळी कांद्याला जास्तीचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. याउलट सामान्य गृहिणींच्या घराचे बजेट कोलमडले आहे.
काय आहेत आजचे राज्यातील कांदा भाव
आज राज्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळी कांद्याला सर्वाधिक कमाल 7151 रुपये, किमान 3300 रुपये तर सरासरी 5700 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमाल 5858 रुपये, किमान 3301 रुपये तर सरासरी 5551 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 4500 रुपये, किमान 2000 रुपये तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 4252 रुपये, किमान 2700 रुपये तर सरासरी 3551 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला कमाल 6700 रुपये, किमान 300 रुपये तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
येत्या १० दिवसांत दर घसरण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा
दरम्यान, नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीत १५ दिवसांपूर्वी सर्वोत्तम दर्जाच्या कांद्याची कमाल किंमत 51 रुपये प्रति किलो इतकी होती. जी आता 70 रुपये प्रति किलोपर्यंत वाढली आहे. याच कालावधीत सरासरी भाव 51 रुपये प्रति किलोवरून 58 रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. बांगलादेशने कांद्यावरील आयात शुल्क हटवल्यामुळे निर्यातही वाढली आहे. देशात इतरत्र नवीन पिकांची आवक सुरू झाल्यानंतर 8-10 दिवसांनी कांद्याच्या किमती घसरतील, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कांदा दर पाच वर्षांतील सर्वोच्च पातळीवर
गेल्या आठवड्यात नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये कांद्याने प्रतिकिलो ५४ रुपये हा पाच वर्षांतील उच्चांक गाठला होता. दिवाळीनिमित्त देशभरातील घाऊक बाजार अनेक दिवस बंद असल्याने, पुरवठ्याच्या कमतरतेमुळे हे घडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात घाऊक दरात 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर आवक कमी असल्याने भाव वाढत असल्याचे फलोत्पादन उत्पादने निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले आहे.
का वाढलेत कांदा दर?
कांद्याच्या दराने पुन्हा एकदा सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. किरकोळ बाजारात कांदा दर सध्या प्रति किलोमागे 80 रुपये इतके आहे. नवीन पीक न आल्याने आणि निर्यातीत वाढ झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये खरीप पिकाची गुणवत्ता खराब होती. याशिवाय निर्यातीची मागणीही वाढली आहे. या कारणांमुळे कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत.