बाय-बाय विस्तारा... आज विस्ताराची विमाने शेवटची उड्डाणे भरणार; एअर इंडियात होणार विलिन!
देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी विस्ताराने सोमवारी (ता.11) शेवटचे उड्डाण भरले आहे. विस्तारा ही विमान वाहतुक कंपनी मंगळवारी (ता.12) एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे. 2013 मध्ये टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्ससह संयुक्त उपक्रम करून, पुन्हा विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केला आणि 9 जानेवारी 2015 रोजी विस्ताराने दिल्ली आणि मुंबई दरम्यान पहिले उड्डाण सुरु केले होते. मात्र, आता ९ वर्षांच्या वाटचालीनंतर विस्तारा ही कंपनी आपले कामकाज एअर इंडियामध्ये विलिन करणार आहे.
बाजारातील हिस्सा वाढणार
विस्तारा-एअर इंडियाच्या या विलीनीकरणामुळे, एअर इंडिया देशातील पहिली पूर्ण सेवा वाहक बनेल आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील एअर इंडियाचा बाजारपेठेतील हिस्सा 50 टक्क्यांवरून 54 टक्क्यांपर्यंत वाढेल. दरम्यान, 27 टक्के मार्केट शेअरसह एअर इंडिया आधीच आंतरराष्ट्रीय मार्गांवर वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळे आता विस्तारा-एअर इंडियाच्या विलीनीकरणामुळे त्यात आणखीनच वाढ होणार आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
इंडिगोला आव्हान देण्यासाठी विलीनीकरण
सध्या भारताच्या एव्हिएशन सेक्टरची मार्केट लीडर इंडिगो ही विमान वाहतूक कंपनी आहे. परंतु, एअर इंडिया इंडिगोला आव्हान देण्यासाठी विस्ताराच्या विलीनीकरणाने स्वतःला मजबूत करत आहे. विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर, या दोन्ही कंपन्यांच्या एकूण विमानांची संख्या 144 वरून, 214 विमाने होणार आहे. एअर इंडियाची कमी किमतीची वाहक एअर इंडिया एक्स्प्रेसकडे 90 विमाने आहेत. कंपनीने बोईंग आणि एअरबसकडून 470 नवीन विमानांची मागणी केली आहे, ज्यांची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात इंडिगोला चांगलेच आव्हान मिळणार आहे.
विस्ताराने 6.5 कोटी प्रवाशांनी केला प्रवास
विस्तारा आज आपले शेवटची विमाने उडवत आहे. 11 नोव्हेंबर रोजी या ब्रँड नावाखाली कंपनीची शेवटच्या वेळी उड्डाणे होणार आहे, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गांसह 50 हून अधिक स्थानांवर कंपनीची उड्डाणे कार्यरत आहे. त्यापैकी विस्ताराची 12 देशांसाठी थेट उड्डाणे आहेत. कंपनीकडे 70 विमाने आहेत. 2015 पासून, 6.5 कोटींहून अधिक प्रवाशांनी विस्ताराच्या माध्यमातून प्रवास केला आहे.
प्रवाशांना सर्वसमावेशक सेवा मिळणार
विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतरही विस्तारा एअरलाइनचे नाव संपणार नाही. विमान कंपनी त्याच नावाने कार्यरत राहील. पण, त्याचा कोड बदलेल. विस्तारा एअरलाईनचा कोड एअर इंडियानुसार असेल. विस्ताराच्या फ्लाइट कोडमध्ये एI2 उपसर्ग म्हणून वापरला जाईल. त्यानुसार विस्ताराच्या २.५ लाख ग्राहकांची तिकिटे एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत.