कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण..! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? वाचा... सविस्तर
देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. मात्र, आता लवकरच देशभरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने खाली येऊ शकतात. जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेला सौदी अरेबिया आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या जवळपास सर्व श्रेणीच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे सांगितले जात आहे.
काय आहे घसरणीमागील कारण
मध्यपूर्वेतील दुबईतील खनिजतेल दरातील घसरणीमुळे सौदी अरेबिया हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने असा निर्णय घेतल्यास भारतासाठी ही मोठी दिलासादायक बातमी असणार आहे. स्वस्त क्रूडच्या उपलब्धतेमुळे सौदी अरेबियातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करू शकतात. एका इंग्रजी वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त देत म्हटले आहे की, सौदी अरेबिया कच्च्या तेलाच्या किमती करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.
प्रति बॅरल 50 ते 70 सेंट्सच्या घसरणीची शक्यता
या वृत्तांत म्हटले आहे की, सौदी अरेबियन खनिजतेल अर्थात अरब लाइट क्रूडची अधिकृत विक्री किंमत ऑक्टोबरमध्ये प्रति बॅरल 50 ते 70 सेंट्सने घसरण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात दुबईच्या किमतींमध्येही असाच ट्रेंड दिसून आला आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या 5 पैकी 3 रिफायनिंग स्त्रोतांनी देखील याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, क्रूड ऑईलच्या किमतीत घट व्हावी, अशी चीनकडून देखील मागणी होत आहे. त्यामुळे आता चीनला देखील याचा मोठा फायदा होणार आहे.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात खनिजतेलाचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. ओपेक गटातील आठ सदस्यांनी पुढील महिन्यात दररोज 180,000 बॅरल खनिजतेल उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे. प्रतिदिन 2.2 दशलक्ष बॅरल उत्पादन मर्यादा काढून टाकण्याच्या योजनेचा हा भाग आहे. तथापि, गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई बेंचमार्क मजबूत झाल्यामुळे ऑक्टोबरसाठी अरब लाइटचा ओएसपी थोडा बदलेल, अशी अपेक्षा आहे. असेही सांगितले जात आहे.