एका झटक्यात शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे 3.1 लाख कोटी बुडाले; वाचा... नेमकी का झाली घसरण!
बुधवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी घसरणीचा राहिला आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच, ९ वाजून १५ मिनिटांनी सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टी देखील 200 अंकांनी घसरलेला दिसून आला. ज्यामुळे एकाच झटक्यात गुंतवणूकदारांचे तब्बल 3.1 लाख कोटींचे नुकसान झाले. विशेष म्हणजे बाजार दुपारपर्यंत मंगळवारच्या तुलनेत घसरणीसह व्यवहार करत होता. ज्यामुळे आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी निराशेचा ठरला आहे.
नेमकी का खाल्ली शेअर बाजाराने आपटी
अमेरिकेमध्ये उत्पादन क्षेत्रात घट झाल्याने पुन्हा एकदा मंदीची शक्यता वाढली आहे. ज्यामुळे अमेरिकी शेअर बाजारासह जागतिक बाजारात त्याचा प्रभाव दिसून येत आहे. विशेष म्हणजे भारतीय शेअर मंगळवारी फ्लॅट स्थितीत बंद झाला होता. मात्र, अमेरिकी शेअर बाजाराने मोठी आपटी खाल्ल्याचे समोर येताच, आज सकाळी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला आहे. विशेष म्हणजे ही आपटी इतकी मोठी होती की, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत भारतीय शेअर बाजार सावरू शकलेला नव्हता.
17 ते 18 सप्टेंबर रोजी होणाऱ्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
(फोटो सौजन्य – istock)
भारतीय शेअर बाजारात आज आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. याशिवाय अन्य अनेक शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ज्यामुळे आज शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 3.1 लाख कोटी रुपयांनी घसरून, 462.4 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले आहे.
कोणत्या शेअर्समध्ये झाली आज घसरण
आज मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्सवरील बहुतांश शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे यात एशियन पेंट्स, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्हचे फक्त तीन समभाग ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. तर टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस सारखे आयटी शेअर्स 1.25 टक्क्यांपर्यंत घसरले. जेएसडब्ल्यू स्टील सर्वात जास्त 2 टक्क्यांनी घसरला. एल अँड टी, टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, ॲक्सिस बँक, एसबीआय या शेअर्समध्ये प्रत्येकी 1 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
दरम्यान आज दुपारी शेवटचे वृत्त हाती आले. तोपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स मंगळवारच्या तुलनेत ३४१.५० अंकांच्या घसरणीसह ८२,२१३.९४ अंकांवर व्यवहार करत होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी हा मंगळवारच्या तुलनेत १२२.१० अंकांच्या घसरणीसह २५,१५७.७५ अंकांवर व्यवहार करत होता.