पेट्रोलियम निर्यातीत भारताचा डंका; युरोपीय देश शुद्ध इंधनासाठी होतायेत नतमस्तक, निर्यातीत 253788 टक्क्यांनी वाढ
भारत हा देश मोठ्या प्रमाणात कच्च्या खनिज तेलाची आयात करतो. मात्र, असे असले तरी भारतातून अनेक देशांना पेट्रोलियम उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. 2018-2019 ते 2023-2024 या कालावधीत भारतातून युरोपमध्ये पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत 253788 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर युक्रेन-रशिया युद्ध या समस्यांमुळे भारतातून युरोपमध्ये पेट्रोलियम निर्यातीत मोठी वाढ झाली आहे.
थिंक टँक जीटीआरआयच्या अहवालातून माहिती समोर
दरम्यान, आर्थिकदृष्ट्या (मुल्याचा) विचार करता, या देशांना पेट्रोलियम पदार्थांची भारतातून होणारी निर्यात ही या कालावधीत 250 टक्क्यांनी वाढली आहे. थिंक टँक जीटीआरआयच्या अहवालानुसार, चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, भारत 151 देशांसोबत व्यापार अधिशेषात राहिला, तर 75 देशांसोबत भारताच्या व्यापारामध्ये तूट दिसून आली आहे.
(फोटो सौजन्य – लिंक्डइन)
हे देखील वाचा – मुंबईने पुन्हा घातली आकाशाला गवसणी; जगातील उंच इमारतींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर!
भारतातून पेट्रोलियम निर्यात वाढली
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारत ज्या देशांमध्ये पेट्रोलियम पदार्थ निर्यात करतो. त्यापैकी 15 ते 17 युरोपीय देशांचा टॉप 100 देशांमध्ये समावेश आहे. 2018-19 मध्ये या देशांना भारतातून पेट्रोलियम निर्यात ही 9,740.51 मेट्रिक टन इतकी झाली होती. जी 2023-24 मध्ये वाढून 24.73 दशलक्ष मेट्रिक टन झाली आहे.
मूल्याच्या दृष्टीने विचार करता, 2018-19 मध्ये भारतातून पेट्रोलियम निर्यात 5.9 अब्ज डॉलर किमतीची झाली होती. जी 2023-24 मध्ये 20.5 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. या काळात भारताने नेदरलँडला सर्वाधिक पेट्रोलियम निर्यात केले आहे. रॉटरडॅम बंदर हे युरोपातील महत्त्वाच्या बाजारपेठांचे केंद्र असून, ते युरोपमधील सर्वात मोठे बंदर आहे. त्यामुळे भारताची नेदरलँडला पेट्रोलियम पदार्थांची निर्यात वाढण्यास मदत झाली आहे.
या देशांमध्ये होते सर्वाधिक निर्यात
नेदरलँड व्यतिरिक्त भारतातून पेट्रोलियम आयात करणाऱ्या युरोपीय देशांमध्ये ब्रिटन, फ्रान्स, रोमानिया, स्वित्झर्लंड, रशिया, स्पेन, बेल्जियम, नॉर्वे, पोलंड, बल्गेरिया, स्लोव्हेनिया, ग्रीस, युक्रेन, जर्मनी, पोर्तुगाल आणि फिनलंड या देशांचा समावेश होतो. त्यामुळे आता भारत हा युरोपमध्ये सर्वाधिक शुद्ध इंधन निर्यात करणारा देश ठरला आहे. भारताच्या बल्क डिझेल मार्केटमध्ये नायरा एनर्जी या रिलायन्स इंडस्ट्रीजची गुंतवणूक कंपनी आणि रशियाची सरकारी तेल कंपनी रोसनेफ्ट यांचे वर्चस्व आहे. मात्र, रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात होत असल्याने भारताची व्यापार तूटही वाढत आहे.