PPF Nominee Update: पिपीएफ खतेदारांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मोठा दिलासा, अर्थमंत्र्यांनी बदलले 'हे' नियम (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
पीपीएफ खातेधारकांसाठी करण्यात आलेल्या या बदलाबाबत सरकारकडून अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. २ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या या अधिसूचनेमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की पीपीएफ खात्यातील नॉमिनी अपडेटवरील शुल्क रद्द करण्यात आले आहे. गव्हर्नमेंट सेव्हिंग्स प्रमोशन जनरल रुल्स २०१८ मध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. यानुसार, आतापर्यंत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांसाठी नॉमिनी रद्द करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जात होते.
अर्थमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नियमांमधील बदलांबाबत सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचना देखील शेअर केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की, नुकतेच पारित झालेल्या बँकिंग दुरुस्ती विधेयक २०२५ अंतर्गत नॉमिनी अपडेट फ्री करण्याव्यतिरिक्त, पीपीएफ खातेधारकांना त्यांच्या ठेवी, सुरक्षित वस्तू आणि लॉकर्सच्या पेमेंटसाठी ४ नॉमिनी जोडण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. बहुतेक व्यावसायिक कर बचतीसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये गुंतवणुकीसोबतच मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज देखील करमुक्त राहतील. पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीवर कलम ८०सी अंतर्गत १.५० लाख रुपयांची कर वजावट उपलब्ध आहे. पीपीएफमधील गुंतवणुकीवर सरकार ७.१ टक्के व्याज देते.
पीपीएफ खात्यात नॉमिनी अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. खातेदाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, नोंदणीकृत नॉमिनीला खात्यातील जमा रक्कम मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि जलद होते. जर नॉमिनीची नोंद नसेल, तर कायदेशीर वारसांना खात्यावर दावा करण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि ही प्रक्रिया खूप वेळखाऊ व किचकट असू शकते. त्यामुळे, सर्व पीपीएफ खातेदारांनी आपल्या खात्यात नॉमिनीची नोंद आहे की नाही हे तपासावे आणि नसल्यास किंवा बदल करायचा असल्यास त्वरित ही प्रक्रिया आता मोफत पूर्ण करावी. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते, याची मॅच्युरिटी १५ वर्षांची असते आणि ती पुढे ५-५ वर्षांसाठी वाढवता येते.