
नोकरीला रामराम ठोकला, दुग्ध व्यवसायात उतरला; करतोय वर्षाला 2 कोटींचा टर्नओव्हर!
सध्याच्या घडीला अनेक तरूण नोकरीला राम राम ठोकत शेती आधारित उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावत आहे. विशेष म्हणजे आपली बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या जोरावर या तरुणांना व्यवसायात मोठ्या प्रमाणात यश देखील मिळत आहे. बाजारपेठेची जाण आणि अनेक बाबींची माहिती असल्याने त्यांना मोठी कमाई देखील होत आहे. याच पार्श्वभुमीवर आज आपण एका उच्चशिक्षीत तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या कर्तृत्वावर तब्बल २ कोटी टर्नओव्हर असलेला दुग्ध व्यवसाय उभा केला आहे.
नोकरीला ठोकला रामराम
हरिओम नौटियाल असे या तरुणाचे नाव असून, तो उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील रहिवासी आहे. हरिओम नौटियाल हे चांगल्या पगाराची नोकरी करत होते. मात्र, नोकरीत मन रमत नसल्याने उद्योगधंद्यात उतरण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी नोकरीला रामराम ठोकत, ते गावी परतले. मात्र, त्यावेळी अनेकांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. परंतू, ते आज वर्षाला दोन कोटी रुपयांचा दुग्ध व्यवसाय चालवत आहे. आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी 500 जणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
दहा गायींपासून दुग्ध व्यवसायाची सुरुवात
हरिओम नौटियाल यांनी दहा गायींपासून आपल्या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना अनेक अडचणी आल्या. दुध भरपूर मात्र ते विक्री करायचे कुठे, याबाबत त्यांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी हार न मानता आपला व्यवसाय सुरुच ठेवला. हळुहळू हरिओम नौटियाल यांना स्थानिक शेतकऱयांचा देखील पाठिंबा मिळू लागला. यातूनच 2016 मध्ये हरिओम यांना दूध संकलन केंद्र सुरू केले. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप पुर्णत बदलून त्यांना मोठे यश मिळाले.
हेही वाचा – क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का… डिज्नी हॉटस्टार बंद होणार; वाचा… नेमकं काय आहे कारण!
जिंकलाय ग्राहकांचा विश्वास
हरिओम यांनी आपल्या दुधाच्या गुणवत्तावर लक्ष दिले. त्यामुळे जनतेचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी ठरले. आज हरिओम डेहराडून आणि ऋषिकेश या आसपासच्या परिसरामध्ये दररोज 250 लिटर दूध विकत आहेत. ‘धान्य धेनू’ असे त्यांच्या उपक्रमाचे नाव आहे. ऋषिकेशमध्ये राहणारे अनेक ग्राहक गेल्या नऊ वर्षांपासून हरिओमकडून दूध खरेदी करत आहेत. त्यांना ताजे आणि शुद्ध दूध मिळते.
वर्षाला करतोय २ कोटींची उलाढाल
दूध विक्रीसोबतच हरिओम सध्या मावा, आईस्क्रीम, रबडी, फालूदा आणि लोणचेही बनवतात. ते आपली उत्पादने स्थानिक बाजारपेठेत तसेच व्यापार मेळ्यांमध्ये विक्री करतात. त्यांचा व्यवसाय आता वार्षिक दोन कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंत पोहचला आहे. हरिओमने आपल्या दुग्ध व्यवसायातून 15 गावांतील 500 लोकांना दिला आहे. त्याच्या दुग्ध व्यवसायातील यशोगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.