क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का... डिज्नी हॉटस्टार बंद होणार; वाचा... नेमकं काय आहे कारण!
क्रिकेटची मॅच म्हटले की, आपल्यापैकी बरेच जण आहे त्या ठिकाणी मोबाईलमध्ये डिज्नी हॉटस्टार सुरु करत लाईव्ह मॅचचा आनंद घेतात. मात्र, आता कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक बातमी आहे. क्रिकेटप्रेमींचा आधार असलेले हे डिज्नी हॉटस्टार लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे आता देशातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
डिस्ने हॉटस्टार जिओ सिनेमात विलीन होणार
अलीकडेच देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी डिज्नी हॉटस्टार खरेदी केले. ज्यामुळे आता डिज्नी हॉटस्टार हा ओटीटी प्लॅटफॉर्म बंद करण्याची योजना अंबानी यांनी आखली आहे. नियामक मंजुरीनंतर, डिज्नी हॉटस्टार बंद होणार असून, केवळ जिओ सिनेमा हा ओटीटी प्लॅटफॉर्म चालवला जाणार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे डिस्ने हॉटस्टार अंबानी यांच्या जिओ सिनेमात विलीन होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज दोन ओटीटी प्लॅटफॉर्म चालवण्याच्या बाजूने नसल्याचे कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – भारतीय रेल्वे वापरणार ‘हे’ प्रगत तंत्रज्ञान; प्रवाशांची समस्या चुटकीसरशी सुटणार!
डिस्ने हॉटस्टार जिओ सिनेमाच्या एकत्रिकरणाची योजना
एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले की, डिस्ने हॉटस्टार आणि जिओ सिनेमा यांचे एकत्रिकरण करण्याची योजना रिलायंस इडंस्ट्रीजकडून जवळपास तयार आहे. त्यामुळे आता जिओ सिनेमाच्या तुलनेत डिस्ने हॉटस्टारचे अधिक डाउनलोड असूनही, ते स्वतंत्रपणे चालवले जाणार नाही. दरम्यान, गुगल प्ले स्टोरच्या अधिकृत माहितीनुसार, डिस्ने हॉटस्टारचे जवळपास 50 कोटी डाउनलोड आहेत. तर जिओ सिनेमाचे केवळ 10 कोटी डाऊनलोड्स आहेत. डिस्ने हॉटस्टारची मालकी वॉल्ट डिस्नेच्या मालकीच्या स्टार इंडियाकडे आहे. तर जिओ सिनेमा रिलायन्सच्या मालकीच्या व्हॉयकॉम 18 द्वारे चालवला जातो.
हेही वाचा – भारत देश अस्थिर बनण्याचा धोका, नारायण मुर्ती यांच्याकडून भिती व्यक्त; वाचा… काय म्हणालेत
जिओ सिनेमा देणार नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइमला टक्कर
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, मासिक आधारावर 22.5 कोटी ग्राहक हे जिओ सिनेमासोबत जोडले गेले आहेत. तर डिस्ने हॉटस्टारचे 33.3 कोटी वापरकर्ते हे मासिक आधारावर आहेत. त्यामुळे हे एकच प्लॅटफॉर्म असल्याने, ते मर्ज केल्यास कंपनीची मोठी बचत होईल, असा दावा केला जात आहे. यामुळे जाहिरातींच्या बाबतीतही यूट्यूबला तगडी स्पर्धा मिळेल. याशिवाय जिओ सिनेमाला नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइमला टक्कर देखील देता येईल, असा दावा जाणकारांकडून केला जात आहे.