स्टेट बँक ऑफ इंडिया साजरा करतेय प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेचा शतकोत्तर वारसा!
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समृद्ध वारशाचा गौरव करून, भारताच्या माननीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी एसबीआयच्या प्रतिष्ठित हॉर्निमन सर्कल शाखेच्या शताब्दीनिमित्त खास 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे अनावरण केले आहे. नाण्याचे अनावरण करत असतानाच वित्तमंत्र्यांनी ‘द इव्होल्युशन ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया’ या मालिकेच्या पाचव्या आवृत्तीचे उद्घाटनही केले आहे. यात 1981 ते 1996 मधील बँकेच्या प्रवासातील एका परिवर्तनीय युगाचे वर्णन आहे. वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) सचिव श्री. एम. नागराजू यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहे की, “एसबीआयचा उल्लेखनीय प्रवास हा त्यांच्या प्रतिष्ठित शाखेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारंभात, वाढ आणि सेवेचा असाधारण वारसा प्रतिबिंबित करतो. 1920 च्या विलीनीकरणाच्या वेळी 100 शाखांवरून आज 22,640 हून अधिक शाखांपर्यंत, आर्थिक वर्ष 2025 मध्ये आणखी 500 जोडण्याच्या योजनांसह, एसबीआयने आपली पोहोच वाढविणे सुरूच ठेवले आहे.
एसबीआयचे योगदान आकडेवारीच्या पलीकडे आहे. एसबीआयने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून आणि आर्थिक समावेशन सुनिश्चित करून भारताच्या बँकिंग लँडस्केपमध्ये परिवर्तन घडविले आहे. परंपरेला आधुनिकतेशी जोडण्याचा बँकेचा प्रवास हेरिटेज शाखांच्या जतनातून दिसून येतो, तर बँकेचे योनो सारखे प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म जागतिक स्तरावर भारताच्या फिनटेक क्षमतांचे प्रदर्शन करतात.”
भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकते. १८०६ मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थापलेली ही बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर २०१२ ची मालमत्ता विचारात घेता, ही भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हिची ५०१ अब्ज डॉलर मालमत्ता व १५७ परदेशी कार्यालये धरून एकूण १५,००३ शाखा होत्या. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत.