टोमॅटोने गाठली शंभरी! व्यापारी म्हणतायेत लवकरच टोमॅटोचे दर 160 किलोचा रुपयांचा उच्चांक गाठणार!
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पावसाळ्यात भाज्यांचे दर कडाडले आहे. प्रामुख्याने टोमॅटोचे दरात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आठवड्यात एपीएमसीमध्ये टोमॅटो 70 ते 80 रुपये किलोने विकला जात होता. मात्र, आता टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा चांगलाच फटका बसत आहे. याउलट शेतकऱ्यांना मात्र या टोमॅटो दरवाढीचा चांगला आर्थिक फायदा होत आहे.
ग्राहकांची खरेदीकडे पाठ
नवी मुंबईत एपीएमसी मार्केटमध्ये कर्नाटक, बंगळुरुमधून टोमॅटोची आवक होते. आवक चांगली असली तरी ग्राहकांनी मात्र प्रचंड दरवाढीमुळे टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी टोमॅटोचा वापर होतोच. मात्र आता एक टोमॅटोऐवजी अर्धा टोमॅटो वापरण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. तर पुढील काही दिवसात मागील वर्षी 160 रुपये विकला जाणारा टोमॅटो त्याचा रेकॉर्ड मोडेल, अशी स्थिती निर्माण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे आता टोमॅटो खरेदी-विक्री व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला असून, ग्राहक नाराज असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
पावसामुळे किरकोळ विक्रीवर मोठा परिणाम
दरम्यान, कर्नाटकातून येणारा टोमॅटो महाराष्ट्रात येण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्याने, नाशवंत माल असल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र असे असले महाराष्ट्रातील टोमॅटोपेक्षा कर्नाटकचा टोमॅटो स्वस्तात उपलब्ध होत आहे. परंतु पावसामुळे सध्या किरकोळ विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. असेही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
नवी मुंबई बाजार समितीत सध्या टोमॅटोची आवक सुरळीत सुरु आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातून सांगली जिल्ह्याच्या विटा भागातून आवक होत आहे. तर पुणे जिल्ह्याच्या सासवड भागातून देखील बऱ्यापैकी आवक होत आहे. याशिवाय शेजारील कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो महाराष्ट्रात दाखल होत आहे. असे असताना पावसामुळे किरकोळ विक्री व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. परिणामी, टोमॅटोची विक्री रोडावली आहे.
– टोमॅटो व्यापारी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती.