टोमॅटो 100 रुपये किलो, दोन महिने दर चढेच राहण्याची शक्यता
यावर्षीच्या पावसाळ्याच्या तोंडावर अनेक भागांमध्ये पडलेल्या भीषण उष्णतेचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. परिणामस्वरूप, सध्या देशभरातील बाजारात टोमॅटो दराने मोठी उसळी घेतली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोला सध्या १०० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळत आहे. तर महाराष्ट्राशिवाय तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देखील टोमॅटोचे दर देखील ८० ते १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले आहेत.
किती मिळतोय घाऊक बाजारात दर?
दरम्यान, महाराष्टातील सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला प्रति क्विंटल 5000 ते 6000 रुपयेपर्यंतचा दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये टोमॅटोने शंभरी गाठली आहे. विशेष म्हणजे उन्हाळी हंगाम आणि पावसाळी हंगाम या दोन्ही हंगामातील काळात टोमॅटोचे भाव नेहमीच वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अर्थात उन्हाळी टोमॅटो पीक संपल्यानंतर वाढत्या उष्णतेमुळे आणि पावसाचा काहीसा विलंब झाल्यास नवीन पावसाळी हंगामातील टोमॅटो पीक बाजारात येण्यास उशीर लागतो. परिणामी, या काळात नेहमीच टोमॅटोचे दर तेजीत असतात.
(फोटो सौजन्य : istock)
दोन महिने दर चढेच राहणार
सध्या तरी वाढलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण होणे अशक्यप्राय आहे. राज्यासह देशभरातील अनेक भागांमध्ये नुकतेच मॉन्सूनचे आगमन झाले आहे. ज्यामुळे नवीन टोमॅटो पीक तयार होऊन, बाजारात यायला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. अर्थात सुरुवातीला देखील आवक कमी राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई होती. परिणामी, आगाद टोमॅटोची आवक बाजारात काहीशी कमीच राहणार आहे. परिणामी, आणखी दोन महिने तरी टोमॅटोचे दर हे चढेच पाहायला मिळणार आहे.
दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
सध्याच्या घडीला देशातील 17 राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव 50 रुपयांहुन अधिक आहे. तर अशी 9 राज्ये आहेत की ज्या ठिकाणी टोमॅटोचा दर हा 60 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. तर 4 राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव 70 रुपयांपेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रात या एकमेव राज्यात टोमॅटोचा भाव 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. उष्णतेची लाट आणि टोमॅटोचे घटलेले उत्पादन यामुळे टोमॅटोच्या दरात ही वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.