(फोटो सौजन्य - Social Media)
भारतातील आघाडीच्या स्मॉल फायनान्स बँकांपैकी एक असलेल्या उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने (Ujjivan Small Finance Bank) युनिव्हर्सल बँकिंग परवाना मिळवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) अधिकृतपणे अर्ज केला आहे. हा निर्णय बँकेच्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असून, भारतीय बाजारपेठेतील स्थान अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेतला गेला आहे. बँकेने आपल्या आर्थिक कामगिरीत सातत्यपूर्ण प्रगती साधली असून, आर्थिक समावेशनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मायक्रोफायनान्सपासून ते सुरक्षित कर्ज क्षेत्रापर्यंत वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाला सेवा देत असलेली ही बँक आता युनिव्हर्सल बँकिंग क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज आहे. आरबीआयकडून मान्यता मिळाल्यास हा उज्जीवन बँकेच्या प्रगतीमधील एक मोठा टप्पा ठरेल.
या विकासाबाबत मत व्यक्त करत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीव नौटियाल म्हणाले, “भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करत आम्ही आज आमचा अर्ज सबमिट केला आहे आणि स्मॉल फायनान्स बँकेमधून युनिव्हर्सल बँकेत स्वइच्छेने बदलण्यासाठी नियामकांकडून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. बँकेने सतत प्रबळ आर्थिक कामगिरी आणि आर्थिक समावेशनाप्रती कटिबद्धता दाखवली आहे, जेथे ती देशभरातील वैविध्यपूर्ण महत्त्वाकांक्षी ग्राहकवर्गाला सेवा देत आहे. युनिव्हर्सल बँकिंग परवानाला मान्यता मिळाल्यास ग्राहकांना सर्वांगीण आर्थिक सेवा देण्याप्रती, तसेच सर्व महत्त्वाकांक्षी भारतीयांना बँकिंग सोल्यूशन्सच्या व्यापक श्रेणीसह सक्षम करण्याप्रती उज्जीवनच्या प्रयत्नांना यश मिळेल.”
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने नुकतेच आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या निकालांमधून विविध व्यवसाय विभागांमध्ये सकारात्मक आणि प्रगतीशील विकास दिसून आला आहे. बँकेच्या कर्ज खातेपुस्तिकेच्या वैविध्यामुळे सुरक्षित कर्ज विभागाने एकूण कर्ज खातेपुस्तिकेमध्ये तब्बल ३९% योगदान दिले आहे, जे त्यांच्या स्थिर आणि ठोस धोरणांचे प्रतीक मानले जात आहे. बँकेच्या आर्थिक धोरणांमध्ये ग्राहक केंद्रित दृष्टिकोन कायम राखला गेला असून, विविध कर्ज उत्पादनांद्वारे ग्राहकांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मायक्रो बँकिंग क्षेत्रात उज्जीवनने प्रगतीशील दृष्टिकोन स्वीकारत महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यांनी ग्रुप लोन आणि इंडिव्हिज्युअल लोनसाठी व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सध्या या बँकेचे व्याजदर स्मॉल फायनान्स बँकांमधील सर्वात कमी आहेत. हा निर्णय केवळ ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या कर्ज सेवा देण्यासाठीच नव्हे तर आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
उज्जीवन बँकेने त्यांच्या आर्थिक समावेशन धोरणांतर्गत ग्राहक संतुष्टी आणि उत्तम मालमत्ता व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे मायक्रोफायनान्स तणावाचे कार्यक्षम व्यवस्थापन साधण्यात त्यांना यश आले आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजांना प्रतिसाद देत, त्यांनी डिजिटल आणि भौतिक बँकिंग सुविधांमध्येही अनेक सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे सेवा अधिक सोयीस्कर बनल्या आहेत. युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर उज्जीवनचे उद्दिष्ट व्यापक आर्थिक सेवा पुरवणे आहे. जर त्यांचा अर्ज मंजूर झाला, तर ही मान्यता बँकेच्या दीर्घकालीन यशाचा आणि आर्थिक सेवांमध्ये विस्ताराचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यामुळे ग्राहकांना व्यापक बँकिंग सेवा मिळतील आणि बँकेचे देशव्यापी नेटवर्क अधिक मजबूत होईल, ज्याचा थेट फायदा सामान्य लोकांना होईल.