नवी दिल्ली – वाहन उद्योगातील विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा तीव्र (Heart Attack) झटका आला होता. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे (Toyota Kirloskar Motors Pvt Ltd) ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार (Toyota Car) भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.
विक्रम किर्लोस्कर यांनी एमआयटीमधून (MIT) मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. ते किर्लोस्कर समूहाच्या (Kirloskar Group) चौथ्या पिढीचे प्रमुख होते. तसेच किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष होते. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर हे शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर आले होते.
टोयोटा इंडियाने मीडिया निवेदन जारी करून विक्रम किर्लोस्कर यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. २९ नोव्हेंबर रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि मित्रांप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. विक्रम किर्लोस्कर यांच्यावर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.