"नीती आयोग रद्द करा"; पीएम मोदींसोबतच्या बैठकीआधी ममता बॅनर्जींची मोठी मागणी!
शनिवारी (ता.२६० नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक होणार आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही दिल्लीत पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी बैठकीच्या एक दिवस आधी, नीती आयोग रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्या कार्यरत असलेला नीती आयोग रद्द करा आणि नियोजन आयोग परत पुन्हा सुरु करा. नियोजन आयोग ही नेताजी बोस यांची कल्पना होती. असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय हे सरकार आपआपसातील भांडणातूनच पडेल, थोडा धीर धरा. असा उच्चारही त्यांनी यावेळी केला आहे.
विकसित भारत @2047 ही असेल थीम
दरम्यान, वर्ष 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 27 जुलै 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची 9 वी बैठक होणार आहे. ज्याची थीम विकसित भारत @2047 अशी ठेवण्यात आली आहे. भारताला विकसित राष्ट्र कसे बनवता येईल? यावर या बैठकीचा भर असणार आहे.
हेही वाचा : जुनं घर विकायचंय, नाही लागणार एक रुपयाही टॅक्स; बस्स… एवढे एक काम करा!
नेमकी काय चर्चा होणार?
नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विकसित भारत @ 2047 वर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला केंद्र आणि राज्य सरकारांमधील महत्वाची अनेक जण उपस्थित असणार आहे. यावेळी सहभागात्मक प्रशासन आणि भागीदारी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाईल आणि सरकारी हस्तक्षेपाद्वारे ग्रामीण आणि शहरी रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यासाठी वितरण यंत्रणा सुधारित केली जाईल. 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात राज्यांच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
30 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट
भारत सध्या 5 ट्रिलियन डॉलर जीडीपीसह जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. तर आता देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. असे नीती आयोगाने उद्याच्या बैठकीसाठी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सहयोगात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे, असेही नीती आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 9 व्या NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या व्हिजनवर चर्चा केली जाईल आणि टीम इंडिया म्हणून केंद्र आणि राज्यांनी कसे काम करावे यावर चर्चा केली जाईल.