विप्रोच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी; कंपनी 17 ऑक्टोबरला शेअरधारकांना देणार बोनस शेअर्स!
देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रो आपल्या शेअर धारकांना मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना बोनस देऊ शकते. त्यावर 17 ऑक्टोबर रोजी बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विप्रोने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स देण्याच्या विचार करत असल्याची माहिती समोर आल्याच्या माहितीनंतर सोमवारी (ता.14) विप्रोच्या शेअरने सुमारे 5 टक्क्यांनी उसळी घेतली आहे.
17 ऑक्टोबर होणार अधिकृत घोषणा
13 ऑक्टोबर रोजी विप्रोने स्टॉक एक्स्चेंजसह नियामक फाइलिंगमध्ये सांगितले आहे की, 16-17 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेअरधारकांना बोनस शेअर्स देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. बोर्डाच्या बैठकीचा निकाल काहीही असो, तो उघड केला जाईल. आणि 17 ऑक्टोबर 2024 रोजी स्टॉक एक्सचेंजला त्याबाबत माहिती दिली जाईल. म्हणजेच बोनस शेअर्स देण्याबाबत बोर्डाच्या निर्णयाची माहिती 17 ऑक्टोबर रोजी समोर येणार आहे. असे अधिकृतरित्या कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – सोमवार ठरला शुभ; शेअर बाजार तेजीसह बंद; वाचा… कोणते शेअर्स राहिले तेजीत!
विप्रोचा शेअर पोहोचला 551.85 रुपयांवर
शेअरधारकांना बोनस शेअर्स देण्याचा विचार कंपनी करत असल्याचे समोर आल्यानंतर विप्रोचा शेअर आज 551.85 रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील बंद झालेल्या 528.30 च्या तुलनेत, सुमारे 5 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या हा शेअर ४.०८ टक्क्यांच्या वाढीसह ५४९.८५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर विप्रोच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे संपूर्ण आयटी निर्देशांकात जोरदार वाढ दिसून आली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1.32 टक्के किंवा 560 अंकांच्या वाढीसह 42,894 रुपयांवर व्यवहार करत आहे.
हे देखील वाचा – एका झटक्यात डी-मार्टचा शेअर 9 टक्क्यांनी घसरला; प्रमोटर्संचे हजारो कोटींचे नुकसान!
2024 मध्ये 17 टक्के परतावा
विप्रो कंपनी 17 ऑक्टोबर 2024 रोजी आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. चालू वर्षात आयटी शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली असली तरी विप्रोच्या शेअर्समध्ये तितकीशी वाढ झालेली नाही. 2024 मध्ये आतापर्यंत कंपनीच्या स्टॉकने केवळ 17 टक्के परतावा दिला आहे. दोन वर्षांत स्टॉक 46 टक्के आणि एका वर्षात 33 टक्क्यांनी वाढला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)