झी-सोनी यांच्यातील वाद अखेर मिटला; झी इंटरटेनमेंटच्या शेअर्समध्ये तब्बल 11 टक्क्यांनी उसळी!
झी एंटरटेनमेंट लिमिटेड आणि सोनी इंडिया यांच्यातील वाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही समुहांनी आपल्यातील रुसवेफुगवे दुर करत, सर्व वाद मिटवण्याचे मान्य केले आहे. झी एंटरटेनमेंट लिमिटेडकडून आज (ता.२७) याबाबत माहिती देण्यात आली आहे. सिंगापूर इंटरनॅशनल लवाद केंद्रासमोरील सर्व अर्ज आणि त्यात करण्यात आलेले दावे-प्रतिदावे मागे घेणे. यासह सर्व विवादांचे निराकरण करण्यासाठी झी एंटरटेनमेंट लिमिटेडने कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेड (सोनी इंडिया) आणि बांगला एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत करार केला आहे. अशी माहितीही झी एंटरटेनमेंट लिमिटेडकडून देण्यात आली आहे.
10 अब्ज डॉलरचा करारही संपुष्टात येणार
विशेष म्हणजे संबंधित कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्यामध्ये 10 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आणण्याबाबत देखील सहमती झाली आहे. त्यामुळे आता याबाबतची माहिती समोर येताच झी एंटरटेनमेंट लिमिटेडच्या शेअर्सने तब्बल 11 टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) वर आज झी एंटरटेनमेंट लिमिटेडचा शेअर वाढीसह 151.10 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे झीच्या गुंतवणुकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
एकमेकांविरुद्धचे दावे-प्रतिदावे मागे घेणार
झी एंटरटेनमेंट लिमिटेडने सोनी इंडिया आणि बांगला एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडसोबत केलेल्या करारात सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्रासमोरील सर्व अर्ज मागे घेण्याचे आणि एकमेकांविरुद्ध दावे-प्रतिदावे मागे घेण्याचे मान्य केले आहे. तसेच, दोन्ही कंपन्या एनसीएलटीमध्ये एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या याचिका देखील मागे घेणार आहेत. याबाबत संबंधित नियामक अधिकाऱ्यांना देखील याबाबत माहिती दिली जाणार आहे. याशिवाय दोन्ही कंपन्यांमधील 10 अब्ज डॉलरचा विलीनीकरणाचा करार देखील संपुष्टात येणार आहे. दरम्यान, एप्रिलमध्ये झी एंटरटेनमेंट लिमिटेडने एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठात सोनीविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
का झाली डील रद्द?
झी-सोनी विलीनीकरणास एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने 10 ऑगस्ट 2023 रोजी मान्यता दिली होती. या अंतर्गत झी सोनी ग्रुपच्या बीईपीएल आणि कल्व्हर मॅक्स एंटरटेनमेंट या दोन कंपन्यांमध्ये विलीन होणार होते. यामुळे 10 अब्ज डॉलर किमतीची मीडिया कंपनी तयार होणार होती. पण यावर्षी 22 जानेवारीला सोनी इंडियाने हे विलीनीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोनी इंडियाच्या म्हणण्यानुसार, करारातील काही आर्थिक अटी पूर्ण करण्यात झी समुह अयशस्वी ठरला. जर हे विलीनीकरण झाले असते तर ते देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क बनले असते. मात्र, काही आर्थिक अटी पूर्ण करण्यात अयशस्वी असल्याचे कारण पुढे करत सोनी इंडीयाने ही डील झुगारून लावली आहे.