
फोटो सौजन्य - Social Media
परिस्थिती अत्यंत कठीण झाली, आजूबाजूला निराशेचं अंधार दाटून आला आणि कुठेही आशेची किरण दिसेनाशी झाली, तरीही हार न मानता पुन्हा उभं राहण्याचं धैर्य ज्या लोकांकडे असतं, तेच खऱ्या अर्थाने यश मिळवतात. असेच जिद्द, चिकाटी आणि वेगळा विचार करण्याची तयारी असलेले फ्लोरिडातील २५ वर्षीय सॅम रॅबिनोविट्ज सध्या जगभरात तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. अपयशाने खचून न जाता त्यांनी जे पाऊल उचललं, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
सॅम रॅबिनोविट्ज यांनी फायनान्स विषयात शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळेल, असा त्यांचा विश्वास होता. मात्र वास्तव काहीसं वेगळंच ठरलं. नोकरीसाठी त्यांनी तब्बल १००० हून अधिक कंपन्यांमध्ये अर्ज केले, परंतु एकाही ठिकाणाहून मुलाखतीसाठी कॉल आला नाही. सातत्याने नकार मिळाल्यामुळे निराशा येणं स्वाभाविक होतं. अनेक जण अशा टप्प्यावर प्रयत्न सोडून देतात, पण सॅम यांनी हार मानली नाही. उलट, पारंपरिक मार्गाने यश मिळत नसेल, तर वेगळा मार्ग शोधायचा, असा त्यांनी ठाम निर्णय घेतला. लेबर डे वीकेंडच्या निमित्ताने सॅम एका लग्न समारंभाला गेले होते. तिथेच त्यांच्या मनात एक आगळावेगळा विचार चमकून गेला. “जर ऑनलाइन अर्ज, ईमेल्स आणि लिंक्डइनवरून नोकरी मिळत नसेल, तर प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून पाहावं,” असा त्यांनी विचार केला. लग्नाहून घरी परतल्यावर त्यांनी एक मोठा प्लेकार्ड तयार केला आणि तो हातात घेऊन थेट न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजसमोर उभे राहिले.
त्या प्लेकार्डवर लिहिलेला मजकूर अनेकांचं लक्ष वेधून घेणारा होता. त्यावर लिहिलं होतं “लिंक्डइनवर प्रयत्न केला, ईमेलवर प्रयत्न केला, आता वॉल स्ट्रीटवर प्रयत्न करत आहे. मला फायनान्स किंवा ट्रेडिंग क्षेत्रात इंटर्नशिप किंवा एन्ट्री-लेव्हल नोकरी हवी आहे. मी मेहनती आहे आणि काम करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.” न्यूयॉर्कसारख्या गजबजलेल्या शहरात, स्टॉक एक्सचेंजसमोर अशा प्रकारे नोकरीची मागणी करणं अनेकांना विचित्र वाटलं, तर काहींना ते अत्यंत धाडसी आणि प्रेरणादायी भासलं. अनेक लोक थांबले, सॅम यांच्याशी संवाद साधला, त्यांची कहाणी ऐकली आणि त्यांच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं. सोशल मीडियावरही सॅम यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. एका आयपीओ कंपनीतील पार्टनरने सॅम यांना संपर्क साधला, मुलाखतीसाठी बोलावलं आणि ऑफिसचा दौरा देखील करून दिला. या अनुभवाबद्दल सॅम सांगतात की, मुलाखत आणि ऑफिस पाहिल्यानंतर त्यांना आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं. जरी अद्याप ऑफर लेटर मिळालेलं नसले, तरीही आपल्याला ही नोकरी नक्की मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सॅम रॅबिनोविट्ज यांची ही कहाणी तरुणांसाठी एक महत्त्वाचा संदेश देते. अपयश कितीही मोठं असलं, तरी जिद्द, चिकाटी आणि वेगळा विचार करण्याची तयारी असेल, तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. हार न मानता सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांसाठी संधी कुठूनही चालून येऊ शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे.