
फोटो सौजन्य - Social Media
नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुण-तरुणींसाठी बँक ऑफ महाराष्ट्रकडून एक आनंदाची संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली असून, या भरतीद्वारे ६०० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांना आता थेट अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.
अनेकांना अप्रेंटिसशिप म्हणजे नेमके काय, याबाबत शंका असते. अप्रेंटिसशिप ही एक प्रशिक्षणाधारित संधी असून, यात उमेदवारांना प्रत्यक्ष बँकेत काम करण्याचा अनुभव दिला जातो. या कालावधीत बँकेचे रोजचे व्यवहार, ग्राहकांशी संवाद, कागदपत्रांची प्रक्रिया तसेच बँकिंग प्रणालीची सविस्तर माहिती दिली जाते. साधारणतः ही अप्रेंटिसशिप ६ महिने किंवा १ वर्ष कालावधीसाठी असते. या प्रशिक्षणामुळे उमेदवारांना भविष्यात बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात नोकरी मिळवण्याच्या संधी अधिक वाढतात.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या या अप्रेंटिस भरतीसाठी २५ जानेवारी २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या भरतीतील महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिटच्या आधारावर राबवली जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक कामगिरी आणि आवश्यक कागदपत्रे निर्णायक ठरणार आहेत.
पात्रतेबाबत सांगायचे झाल्यास, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. यासोबतच उमेदवाराला संबंधित राज्यातील किंवा परिसरातील स्थानिक भाषा अवगत असणे अनिवार्य आहे. १० वी आणि १२ वीचे शिक्षण स्थानिक भाषेत पूर्ण केल्याचे गुणपत्रिकेद्वारे दाखवावे लागेल. ही अट ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी महत्त्वाची मानली जाते.
अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून, उमेदवारांनी bankofmaharashtra.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रथम नवीन नोंदणी (Registration) करावी, त्यानंतर लॉगिन करून अर्जाचा फॉर्म अचूकपणे भरावा. अर्ज करताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरून छायाचित्र आणि सही अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्यावी आणि भविष्यासाठी अर्जाचा प्रिंटआउट जतन करून ठेवावा.
एकूणच, बँकिंग क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रची ही अप्रेंटिस भरती सुवर्णसंधी ठरू शकते. कोणतीही परीक्षा न देता प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनुभव मिळवण्याची ही संधी असल्याने, इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेआधी नक्की अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.