फोटो सौजन्य - Social Media
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांना स्वतःमधील कला, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक शाळेने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार सई डहाके यांनी केले. कारंजा येथील गोविंद इंग्लिश पब्लिक स्कूल आणि गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १३) शेतकरी निवास सभागृहात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके होते, तर उद्घाटक म्हणून आमदार सई डहाके उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाट्य तसेच विविध सांस्कृतिक सादरीकरणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांमधून त्यांची कला, कौशल्य आणि मेहनत स्पष्टपणे दिसून येत होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष किरण चौधरी, संचालक संतोष चौधरी, स्वप्नाली चौधरी, मुख्याध्यापिका अर्चना काकडे, मुख्याध्यापिका अपर्णा कदम तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका किरण व्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिष वडते व रिना कनोजे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगतात माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांनी गोविंद स्कूल संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव केला. संस्थेने शिक्षणासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संस्थेने राबवलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अरुण ताथोड, बाजार समितीचे संचालक नितीन नेमाने, नगरसेविका शालिनी ठाकरे, नगरसेविका वैशाली गुल्हाने, नगरसेविका कुसुम अघम, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, नगरसेवक अजय श्रीवास आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.






