
फोटो सौजन्य - Social Media
विद्या प्रसारक मंडळाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात दि. १ नोव्हेंबर रोजी डॉ. शुभा थत्ते लिखित ‘अवघाचि संसार’ या आत्मकथन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानी, प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि लोकसत्ता दैनिकाच्या ‘चतुरंग’ संपादक आरती कदम यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुस्तक निर्मितीचा प्रवास सांगताना डॉ. थत्ते म्हणाल्या, “संधिवाताने त्रस्त असतानाही कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे आणि जावई डॉ. प्रदीप कर्णिक यांच्या आग्रहाने मी हे आत्मकथन लिहिले. माझा संघर्ष आणि प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, हीच प्रेरणा होती.” कार्यक्रमाला डॉ. मोहन आगाशे हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते. त्यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “हे आत्मकथन नव्हे तर संपूर्ण काळाचा आरसा आहे. शुभा थत्ते यांचे लेखन चिरंतन आणि पुनःपुन्हा वाचावेसे वाटणारे आहे.”
आरती कदम म्हणाल्या, “वेदनांना शस्त्र बनवत शुभा ताईंनी जीवन उभे केले आहे. पुस्तक वाचताना त्यांचा प्रवास डोळ्यांसमोर जिवंत होतो.” डॉ. भरत वाटवानी यांनी शुभा थत्ते यांच्या समाजकार्याचा गौरव करताना सांगितले, ”आयुष्यात काही क्षण येतात जे आपले आयुष्य बदलून टाकतात.त्यांनी बाबा आमटे यांच्या सोबतच्या आपल्या स्मृतींना उजाळा दिला.शुभा थत्ते या आपल्या शिक्षिका असून त्यांनी बागवान चे काम केले.त्या सर्वांच्या रोल मॉडेल झाल्या.आज समाजाला अशा व्यक्तींची गरज आहे.” म्हणत शुभा थत्ते यांच्या कामाचा त्यांनी गौरव केला.
डॉ.आनंद नाडकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की,”माझा मानसिक आरोग्यासोबतचा प्रवास थत्ते मॅडम सोबत सुरू झाला. के.इ.एम.हॉस्पिटल मधील आठवणींना उजाळा देत मानसोपचारातील अनेक उपक्रम,कार्यक्रमाची गंगोत्री शुभा मॅडम पासून सुरू होते,याची त्यांनी जाणीव करून दिली.संशोधनाची वृत्ती त्यांच्यामुळे आमच्यात आली. आपण जे करतोय ते बरोबर आहे हा विश्वास त्यांच्याकडून मिळतो.मॅडम कडे पाहिल्यावर तितिक्षा शब्दाचा अर्थ कळतो.जो आपण घ्यावा.शुभा मॅडम यांची आजची प्रसन्नता आहे,त्यामागे तपश्चर्या आहे. पण संघर्षही तितकाच मोठा आहे. घाव लागल्यावर त्या व्रणाचे कौतुक न करता पुढचे पाऊल कसे टाकावे हे मॅडम कडून शिकावे. “हे त्यांनी प्रामुख्याने अधोरेखित केले.
डिंपल पब्लिकेशन यांनी हे पुस्तक प्रकाशित केले असून, कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ॲड. नीता कर्णिक यांनी आभार प्रदर्शन केले, तर डॉ. अनुराधा सोवनी यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.