पोलीस होण्याचं स्वप्न आता साकार होणार! कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचा पुढाकार, पोलीस भरतीसाठी मोफत मैदानी प्रशिक्षणाचा शुभारंभ
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्याकडून मैदानी प्रशिक्षण सुरू केले आहे. या प्रशिक्षणाची अधिकृत सुरुवात धामोते येथील नेरळ विद्या भवन शाळेच्या मागे असलेल्या मैदानावर झाली. समाज संघटनेचे आजीव सदस्य आणि संचालक बाबू घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तालुक्यातील 22 तरुणांचे मैदानी प्रशिक्षण सुरु करण्यात आले. अशी माहिती समोर आली आहे की, कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांच्याकडून तरुणांना पोलीस भरती प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे, तसेच भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे प्रशिक्षण सेंटर सुरु राहणार आहे.
पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण यांना आर्थिक बाब लक्षात घेऊन कोणत्याही अकॅडमीमध्ये जाऊन प्रशिक्षण घेता येत नाही. अशा तरुणांसाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांनी मैदानी प्रशिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार महिनाभर तालुक्यातील अनेक गावातील तरुण पोलीस भरतीसाठी मैदानी प्रशिक्षण घेत आहेत. आगरी समाज संघटनेच्या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता करण्यात आला. धामोते येथील नेरळ विद्या भवन शाळेच्या मैदानावर हे प्रशिक्षण दिले जात असून तालुक्यातील 22 येथे तरुण सहभागी झाले.
या उपक्रमाचा शुभारंभ समाज संघटनेचे संचालक बाबू घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. त्यावेळी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे, उपाध्यक्ष भगवान धुळे, सचिव जितेंद्र गवळी, सहसचिव संतोष धुळे, आजीव सदस्य प्रभाकर गवळी, रामदास माळी, महेश भगत, संदीप चंचे, बबलू विरले तसेच सोमनाथ विरले आदी उपस्थित होते. यावेळी समाज संघटनेच्यावतीने प्रशिक्षक अनंता भोईर यांचा सत्कार करण्यात आला. मैदानी प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य आणि व्यायामाचे साहित्य संघटनेचे संचालक बाबू घारे यांनी उपलब्ध केले आहे. त्याबद्दल घारे यांचे तसेच मैदान उपलब्ध करून देणारे स्थानिक ग्रामपंचायत सरपंच समाज संघटनेचे संचालक महेश विरले यांचे कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांनी आभार मानले आहेत.
तरुणांना धामोते येथील मैदानावर आठवड्यातून पाच दिवस सकाळी प्रशिक्षण दिले जाते. तर दर रविवारी माथेरान घाटात हे प्रशिक्षण दिले जात असून आठवड्यातील तीन दिवस आगरी समाज हॉल येथे जिम तयार करून देण्यात आली आहे. तर परीक्षा पेपरसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ उपलब्ध करून देणार असल्याचे समाज संघटना अध्यक्ष संतोष पेरणे यांनी यावेळी स्पष्ट केले. कोच अनंता भोईर यांनी या मैदानात प्रशिक्षण घेणारे पाच तरुण मागील वर्षी पोलीस आहेत, यावर्षी आणखी जास्त तरुण यशस्वी झाले पाहिजेत असा आपला प्रयत्न राहील असे आश्वासन भोईर यांनी दिले.
समाज संघटनेचे संचालक बाबू घारे यांनी सांगितलं की, कर्जत तालुक्यातील नेरळ येथील धामोते बी एस टीच्या ग्राउंडवर आगरी समाज पोलीस प्रशिक्षण भरती केंद्र सुरु करण्यात आले आहे. जवळ जवळ एक महिना होऊन गेला आहे, साधारण वीस ते बावीस मुले या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत आहेत. त्यासाठी लागणारा खर्च म्हणजेच कोच, व्यायामाचे साहित्य हे सर्वकाही आगरी समाजाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षण आणि इतर सर्वकाही मुलांना या ठिकाणी मोफत शिकविण्यात येत आहे. त्यामुळे पूर्ण तालुक्यातील सर्व तरुण मुलांना विनंती करण्यात येत आहे तसेच जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या संधीचा फायदा घ्यावा. आपले आयुष्य बळकट करण्यासाठी आणि शरीरसदृष्ट होण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. तसेच त्याचे कोच अनंता भोईर म्हणून सर आहेत. त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी साधारण मागील वर्षांमध्ये एक छोटा उपक्रम घेतला, त्यामध्ये त्यांचे पाच मुले पोलीस झाले. इतरही समाजातील गरीब मूलं असतील त्यांना खर्च परवडत नाही अशा मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा.






