फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) तर्फे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRS) मध्ये मोठ्या प्रमाणावर पदभरती जाहीर झाली आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवारांना २३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.
या भरतीत एकूण ७२६७ पदे उपलब्ध असून त्यात प्राचार्य, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT), ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर (TGT), महिला स्टाफ नर्स, अकाऊंटंट, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट (JSA), लॅब अटेंडंट, हॉस्टेल वॉर्डन, ग्रंथपाल तसेच कला, संगीत व शारीरिक शिक्षण शिक्षक अशा विविध पदांचा समावेश आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर OMR आधारित पेन-पेपर पद्धतीने घेण्यात येणार असून तिचा कालावधी तीन तासांचा असेल.
पात्रता निकष
या भरतीतील प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अट, वयोमर्यादा व अनुभव वेगवेगळा ठेवण्यात आला आहे. उदाहरणार्थ, प्राचार्य पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शाळा प्रशासन, शैक्षणिक कार्यपद्धती व कर्मचारी व्यवस्थापन या क्षेत्रातील ठोस अनुभव अपेक्षित आहे. पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) पदासाठी संबंधित विषयात मास्टर्स डिग्री आणि सोबत B.Ed. पदवी आवश्यक आहे. ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर (TGT) पदासाठी किमान पदवीसह B.Ed. अट ठेवली आहे. महिला स्टाफ नर्स पदासाठी B.Sc. नर्सिंग पदवी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयात प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.
याशिवाय अकाऊंटंटसाठी कॉमर्स पार्श्वभूमी, JSA पदासाठी संगणक व टायपिंगचे कौशल्य, लॅब अटेंडंटसाठी विज्ञान शाखेतील शिक्षण आणि प्रयोगशाळेतील कामाचा अनुभव, तर हॉस्टेल वॉर्डनसाठी व्यवस्थापन कौशल्य व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची क्षमता अपेक्षित आहे. आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेसह वयोमर्यादेत शिथिलता मिळणार असून, सर्वसाधारण उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया: भरतीची प्रक्रिया अनेक टप्प्यांत होणार आहे. यात टियर I आणि टियर II लेखी परीक्षा, काही पदांसाठी कौशल्य चाचणी (उदा. JSA साठी टायपिंग टेस्ट), प्राचार्य पदासाठी मुलाखत आणि अखेरीस दस्तऐवज पडताळणीचा समावेश आहे. निकाल फक्त अधिकृत संकेतस्थळावर (https://nests.tribal.gov.in) उपलब्ध होईल.
वेतनश्रेणी: पदानुसार मानधन वेगवेगळे आहे. प्राचार्यांना ₹78,800 ते ₹2,09,200, PGT साठी ₹47,600 ते ₹1,51,100, TGT साठी ₹44,900 ते ₹1,42,400 तर लॅब अटेंडंटसाठी ₹18,000 ते ₹56,900 इतका पगार मिळेल. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर १०% विशेष भत्ताही देण्यात येणार आहे.