
फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला लेखनाची आवड आहे पण लेखन करण्यासाठी संधी मिळत नाही, तर आता टेन्शन घेण्याची मुळीच गरज नाही. कारण निबंध लिहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला मुंबईच्या बाहेरर जाण्याचीही काही गरज नसणार आहे. विलेपार्ले महिला संघ ग्रंथालय आणि कृष्णाबाई लिमये वाचनालयातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी निबंध स्पर्धा यंदा बाराव्या वर्षात पदार्पण करत आहे. साहित्यप्रेमींसाठी ही स्पर्धा एक प्रतिष्ठेची व्यासपीठ ठरली असून यंदाही स्पर्धेसाठी चार वेगवेगळे आणि समकालीन विषय जाहीर करण्यात आले आहेत.
या वर्षी स्पर्धकांसाठी ‘माझे आवडते संत’, ‘समाजावर मीडियाचा परिणाम व दुष्परिणाम’, ‘पैसा की आनंद – महत्त्वाचे काय?’ आणि ‘शिस्तीचे जीवनातील महत्त्व’ हे चार विषय दिले असून, यापैकी एक विषय निवडून ६०० ते ८०० शब्दांचा निबंध मराठीत लिहावा लागणार आहे.
या स्पर्धेत १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते. प्रत्येक स्पर्धकाला फक्त एकच निबंध पाठवण्याची परवानगी आहे. निबंधासोबत आपले नाव, पत्ता आणि फोन नंबर हे तपशील स्वतंत्र कागदावर नमूद करून फुलस्केप शीटला जोडणे बंधनकारक आहे. ही माहिती निबंधाच्या पानावर लिहू नये, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असून, विजेत्यांना मानाचे बक्षीस देऊन गौरवण्यात येईल. निबंध सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून, सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत ग्रंथालयात प्रत्यक्ष निबंध जमा करता येणार आहे.
ग्रंथालयाचा पत्ता :
विलेपार्ले महिला संघ, ग्रंथालय मंगलायतन,
परांजपे बी स्कीम, रोड क्र. १,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई – ४०००५७.
दरवर्षी प्रमाणे यंदाही स्पर्धेबाबत साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता वाढलेली असून, विविध वयोगटातील स्पर्धकांकडून चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.