
फोटो सौजन्य - Social Media
इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी आठवड्यात ७२ तास काम करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर देशभरात चर्चा सुरू असली, तरी भारतातील Gen Z पिढीची भूमिका मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे चित्र समोर आले आहे. नुकत्याच नोकरी डॉट कॉमने केलेल्या एका मोठ्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की, आजचे तरुण नोकरी निवडताना दीर्घ कामाचे तास किंवा केवळ जास्त पगारापेक्षा वर्क-लाइफ बॅलन्सला सर्वाधिक महत्त्व देत आहेत.
नोकरी डॉट कॉमच्या या सर्वेक्षणात सुमारे २३ हजार Gen Z प्रोफेशनल्सशी संवाद साधण्यात आला. यामध्ये सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या तरुणांनी सांगितले की, नोकरीचा ऑफर स्वीकारताना सर्वात आधी ते काम आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन मिळेल की नाही, हे पाहतात. ‘The Gen Z Work Code’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात आयटी, बँकिंग (BFSI), ऑटोमोबाईल, बीपीओ, शिक्षण अशा सुमारे ८० क्षेत्रांतील तरुणांचा समावेश होता. मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद या मोठ्या शहरांमधील तरुणांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला.
सर्वेक्षणातून आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली असून, अनुभव वाढत जातो तशी वर्क-लाइफ बॅलन्सची गरज अधिक तीव्र होते. विशेषतः ५ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या Gen Z प्रोफेशनल्समध्ये ही मागणी जास्त दिसून आली. या गटातील जवळपास ६० टक्के तरुणांनी वर्क-लाइफ बॅलन्स हीच आपली सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे सांगितले.
Gen Z तरुणांसाठी केवळ कौतुक किंवा प्रशंसा पुरेशी नाही. सर्वेक्षणानुसार ८१ टक्के तरुणांना सार्वजनिक किंवा खासगी कौतुकापेक्षा शिकण्याच्या आणि पुढे जाण्याच्या संधी अधिक महत्त्वाच्या वाटतात. तर ५७ टक्के लोकांच्या मते करिअर ग्रोथ म्हणजे फक्त पदोन्नती किंवा पगारवाढ नसून, नवीन कौशल्ये आत्मसात करणे होय. विशेषतः डिझाइन आणि जाहिरातसारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये हा आकडा ७८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
या सर्वेक्षणात Gen Z साठी कंपनीची सर्वात महत्त्वाची मूल्यव्यवस्था पारदर्शकता (Transparency) असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सुमारे ६५ टक्के तरुणांनी पारदर्शकतेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. ५ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या प्रोफेशनल्समध्ये हा आकडा वाढून ७१ टक्के झाला आहे. याउलट डायव्हर्सिटी, पर्यावरण धोरण आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या बाबी त्यांच्या प्राधान्यक्रमात तुलनेने मागे राहिल्या आहेत.
नोकरी निवडताना Gen Z पगारानंतर सर्वप्रथम वर्क-लाइफ बॅलन्स, त्यानंतर स्पष्ट करिअर ग्रोथ, मग कंपनीची मूल्ये आणि शेवटी लीडरशिप स्टाइलला महत्त्व देते. जर नोकरीत प्रगतीच्या संधी मिळाल्या नाहीत, तर ही पिढी नोकरी सोडण्यासही मागेपुढे पाहत नाही. सर्वेक्षणानुसार १४ टक्के तरुण एका वर्षाच्या आत नोकरी सोडू शकतात, तर ३७ टक्के तरुण दोन ते तीन वर्षांत कंपनी बदलण्यास तयार आहेत.
मात्र, जास्त पगार असलेले तरुण तुलनेने जास्त काळ एका कंपनीत टिकतात. ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ ते २५ लाख रुपये आहे, त्यापैकी ५६ टक्के तरुण पाच वर्षांपर्यंत एकाच कंपनीत काम करण्यास तयार असल्याचे दिसून आले आहे.
ऑफिसमधील तणावाच्या कारणांबाबतही सर्वेक्षणात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ३६ टक्के तरुणांनी वर्क-लाइफ बॅलन्सचा अभाव हे सर्वात मोठे तणावाचे कारण असल्याचे सांगितले. तर ३१ टक्के लोकांनी करिअर ग्रोथ न मिळणे, १९ टक्के लोकांनी टॉक्सिक सहकारी आणि १६ टक्के लोकांनी मायक्रोमॅनेज करणारे बॉस यांना तणावाची कारणे मानले. हा सर्वे स्पष्टपणे दाखवतो की Gen Z साठी काम म्हणजे केवळ नोकरी नसून, संतुलित आणि अर्थपूर्ण आयुष्याचा भाग आहे.