
फोटो सौजन्य - Social Media
दहावी बोर्ड परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षेतील गुणांवर पुढील शिक्षणाचा मार्ग, शाखा निवड आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. त्यामुळे योग्य नियोजन, सातत्य आणि शिस्तबद्ध अभ्यास केल्यास दहावीची परीक्षा ताण न घेता यशस्वीरीत्या पार पाडता येते. खाली दिलेल्या काही खात्रीशीर स्टडी टिप्स विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोगी ठरतील.सर्वप्रथम संतुलित वेळापत्रक तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व विषयांना योग्य वेळ देणे महत्त्वाचे आहे. सकाळी मेंदू ताजातवाना असतो, त्यामुळे गणित, विज्ञान यांसारखे कठीण विषय सकाळच्या सत्रात अभ्यासावेत. सलग ३-४ तास अभ्यास करण्यापेक्षा दर ४५-५० मिनिटांच्या अभ्यासानंतर १० मिनिटांचा ब्रेक घ्यावा. यामुळे एकाग्रता टिकून राहते आणि थकवा येत नाही.
दहावीच्या अभ्यासात एनसीईआरटी (NCERT) किंवा राज्य मंडळाची पाठ्यपुस्तके हीच तुमची ‘गीता’ मानली पाहिजेत. बहुतेक प्रश्न हे थेट पाठ्यपुस्तकावर आधारित असतात. प्रत्येक धडा नीट समजून घ्यावा आणि धड्याच्या शेवटी दिलेले सराव प्रश्न किमान दोनदा सोडवावेत. सूत्रे, व्याख्या आणि महत्त्वाचे मुद्दे पाठ्यपुस्तकातूनच येतात, त्यामुळे बाह्य गाइड्सवर अती अवलंबून राहू नये. नोट्स बनवण्याची सवय लावणे फार उपयोगी ठरते. अभ्यास करताना महत्त्वाची सूत्रे, तारखा, व्याख्या, मुद्दे छोट्या शब्दांत वहीत लिहून ठेवा. परीक्षेच्या आधीच्या शेवटच्या दिवसांत हीच नोट्स झटपट उजळणीसाठी खूप मदत करतात.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हा यशाचा महत्त्वाचा मंत्र आहे. गेल्या ५ ते १० वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवल्याने प्रश्नांची पद्धत, वारंवार विचारले जाणारे धडे आणि गुणांचे विभाजन लक्षात येते. शक्य असल्यास घरीच ३ तासांची वेळमर्यादा ठेवून पेपर सोडवा. यामुळे वेळ व्यवस्थापन आणि लेखनाचा वेग सुधारतो. फक्त वाचून अभ्यास करण्यापेक्षा लिहून सराव करणे अधिक फायदेशीर ठरते. अनेक विद्यार्थ्यांना उत्तर माहिती असते, पण परीक्षेत नीट मांडता येत नाही. त्यामुळे गणिताचे प्रश्न, विज्ञानातील आकृत्या, समीकरणे आणि उत्तरांची मांडणी लिहून सराव करा. नीटस, स्वच्छ आणि मुद्देसूद उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा.
विषयवार विशेष टिप्स देखील लक्षात ठेवा.