फोटो सौजन्य - Social Media
आजच्या स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात लाखो तरुण UPSC परीक्षा देतात. कोण कोचिंग घेतं, कोण लाखोंची फी भरतं, कोण आपली नोकरी सोडून वर्षानुवर्षं अभ्यास करतो… तरीसुद्धा अनेकजण अपयशी ठरतात. पण काही व्यक्ती अशाही असतात ज्या अगदी शून्यातून सुरुवात करून फक्त मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य करतात. IAS सूरज तिवारी ही त्यापैकीच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक सामान्य कुटुंबात सूरजचा जन्म झाला. वडील एका छोट्याशा दुकानात दर्जीचे काम करतात. घरात आर्थिक अडचणी, सोयी-सुविधांचा अभाव, पण सूरज लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने साध्या शाळांमधून शिक्षण घेतलं आणि बी.एससी करायची तयारी सुरू केली. आयुष्य काहीसं स्थिर वाटत असतानाच २०१७ मध्ये दादरी येथे रेल्वे प्रवासादरम्यान एक मोठा अपघात झाला, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं.
या अपघातात सूरजने दोन्ही पाय, उजवा हात आणि डाव्या हाताच्या दोन बोटा गमावल्या. अनेकांसाठी हेच आयुष्य संपल्यासारखं असतं, पण सूरजसाठी ही एक नवीन सुरुवात होती. त्याने तीन महिने खाटेवर असतानाच स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं. जरी शरीर अपंग झालं होतं, तरी मन अजूनही ध्येयाशी जोडलेलं होतं. त्याने ठरवलं “आता मागे हटायचं नाही.”
सर्वसामान्य तरुण जिथे मोबाईल, इंटरनेट, क्लासेस आणि गाईड्सवर अवलंबून असतो, तिथे सूरजने फक्त उरलेल्या तीन बोटांच्या मदतीने अभ्यास सुरू केला. २०१८ मध्ये त्याने JNU, दिल्ली येथे BA मध्ये प्रवेश घेतला. त्याने कोणतीही कोचिंग घेतली नाही, की कोणताही मार्गदर्शक ठेवला नाही. स्वतःच पुस्तकं वाचून, नोट्स करून, दिवसरात्र अभ्यास केला.
या सर्व संघर्षाचा परिणाम म्हणजे 2023 च्या UPSC परीक्षेत त्याने पहिल्याच प्रयत्नात 971 वा क्रमांक मिळवला आणि IAS अधिकारी म्हणून यश मिळवलं. ही केवळ परीक्षा पास करण्याची गोष्ट नाही, ही एका अशा तरुणाची गोष्ट आहे ज्याने अपंगत्वालाही नमवून स्वतःच्या आयुष्याचं ध्येय गाठलं.
सूरजची ही कहाणी एक संदेश देते. शरीराचं बळ महत्वाचं नसतं, मनाचं बळ खूप मोठं असतं. संकटं आयुष्यात येतातच, काही वेळा ती शारीरिक असतात, काही वेळा मानसिक. पण जो माणूस आपल्या जखमांवर फुंकर घालण्याऐवजी त्याच जखमांचा वापर झेप घेण्यासाठी करतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.
आज सूरज तिवारीसारखे लोक समाजातल्या कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. त्यांच्या आयुष्यात दुःख, अपघात, आणि शारीरिक मर्यादा आल्या, पण त्यांनी एक गोष्ट कायम ठेवली: जिद्द! आणि ही जिद्दच त्यांना अशक्य वाटणाऱ्या मार्गांवरून यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेली.