
फोटो सौजन्य - Social Media
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयओसीएलने ज्युनियर इंजिनिअर पदांच्या एकूण ३९४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आज, २० डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी असलेल्या आयओसीएलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
या भरती अंतर्गत केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तसेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखांमधील ज्युनियर इंजिनिअर पदांचा समावेश आहे. उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२५ या तारखेच्या आधारे मोजले जाणार आहे. तसेच शासन नियमांनुसार आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (ओबीसी) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादेत सवलत लागू असेल.
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून केमिकल इंजिनिअरिंग, केमिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या शाखांमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच आयओसीएलकडून निश्चित करण्यात आलेल्या इतर अटी व पात्रतांची पूर्तता उमेदवारांनी करणे बंधनकारक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देण्यात येणार असून ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी प्रतिमाह किमान २५ हजार रुपये ते कमाल १ लाख ५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. याशिवाय केंद्र सरकारच्या नियमांनुसार विविध भत्ते आणि सुविधा देखील मिळणार आहेत. त्यामुळे या भरतीकडे तरुणांचा मोठा ओढा राहण्याची शक्यता आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम आयओसीएलच्या अधिकृत संकेतस्थळ www.iocl.com ला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवरील ‘What’s New’ या विभागात जाऊन “Click here to Apply Online” या लिंकवर क्लिक करावे. पुढील टप्प्यात मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करून अर्ज सादर करावा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आयओसीएलमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असून ही भरती प्रक्रिया त्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा, असे आवाहन आयओसीएलकडून करण्यात आले आहे.