फोटो सौजन्य - Social Media
शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा तिसरा टप्पा राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून यापूर्वीच सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे १५ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळांच्या गुणांकन पद्धतीत काही सुधारित सूचना लागू करण्यात आल्या असून त्या सर्व संबंधित घटकांनी काटेकोरपणे अमलात आणाव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष निर्देश दिले आहेत. दोन्ही शासन निर्णयांमधील सर्व सूचना आपल्या स्तरावरून सविस्तर गुणांकन करणाऱ्या समितीच्या निदर्शनास आणाव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच १६ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चारमध्ये नमूद केलेल्या उपक्रमांनुसार शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रम, योजना आणि अभियानांची अद्ययावत स्थिती गुणांकन करताना विचारात घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या स्थितीकडे पाहता १९ डिसेंबरपर्यंत एकूण ३८ हजार २२ शाळांनी माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे आढळून आले आहे. मात्र यापैकी केवळ २६ हजार ६७६ शाळांनीच माहिती अंतिम केली आहे. उर्वरित शाळांची माहिती अद्याप अपूर्ण असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व शाळांनी दिलेल्या कालावधीत माहिती अंतिम करावी आणि कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, केंद्रस्तरावर मूल्यांकन प्रक्रियेसाठी समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला २५ डिसेंबर रोजी प्रवेश उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळापत्रकानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.






