फोटो सौजन्य - Social Media
कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) तर्फे राबवण्यात येणाऱ्या कोटक कन्या शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत मुलींना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार मिळतो. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना दरवर्षी ₹1,50,000 पर्यंतची मदत 4 ते 5 वर्षांसाठी दिली जाते. फक्त आर्थिक सहाय्यच नव्हे तर शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासासाठी मेंटरिंग, जीवन कौशल्ये, मानसिक आरोग्य सत्रं तसेच इंजिनिअरिंग विद्यार्थिनींसाठी Unstop आणि वैद्यकासाठी Marrow यांसारख्या सदस्यता सुविधा देखील दिल्या जातात. देशातील 136 अग्रगण्य संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलींना या उपक्रमाचा लाभ मिळतो. 2021 पासून आतापर्यंत 24 राज्यांतील 1,025 पेक्षा अधिक मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ झाला असून, फक्त 2024 मध्येच 500 नवीन विद्यार्थिनींचा समावेश झाला.
KEF शिष्यवृत्ती प्रमुख आरती कौलगुड यांनी सांगितले की, “कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये आमचे ध्येय केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेपलीकडे जाते. कोटक कन्या शिष्यवृत्तीद्वारे आम्ही केवळ तेजस्वी मुलींना आर्थिक पाठबळ देत नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व, विवेकबुद्धी आणि क्षमतांमध्ये गुंतवणूक करतो. यावर्षी पहिला गट दृढ नियुक्त्या आणि सकारात्मक उद्देश्यांसह कार्यक्षेत्रात पदार्पण करतो आहे. त्या जिथे जातील तिथे नेतृत्व आणि चिकाटीचा ठसा उमटवतील.” तर कोटक महिंद्रा बँकेचे CSR व ESG प्रमुख हिमांशू निवसकर यांनी स्पष्ट केले की, “कोटक महिंद्रा बँकेत आम्ही मानतो की सर्वसमावेशक वाढ ही समुदायपरिवर्तनाची पहिली पायरी आहे. कोटक कन्या शिष्यवृत्ती वंचित समाजातील बुद्धिमान मुलींना दर्जेदार शिक्षण व त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी देते. वर्षानुवर्षे हा उपक्रम वाढत गेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यामुळे आपल्या समुदायांना दिशा देणारे आणि देशासाठी अधिक न्याय्य भविष्य घडवणारे परिवर्तनकारी नेते निर्माण होतील.”
या शिष्यवृत्ती साठी अर्ज करणाऱ्या मुलींची पात्रता निकषही स्पष्ट करण्यात आले आहेत. उमेदवार भारतातील कोणत्याही राज्यातील असू शकतात, परंतु त्यांनी बारावीत किमान 75% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹6 लाखांपेक्षा कमी असावे आणि विद्यार्थिनीने NIRF किंवा NAAC मान्यता प्राप्त संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला असावा.
KEF गेली दोन दशके शिक्षण, कौशल्ये आणि संधींच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या उपक्रमांत शालेय शिक्षण कार्यक्रमांतर्गत पीएम श्री शाळा, डिजिटल वर्गखोल्या व शिक्षक प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी कन्या शिष्यवृत्ती, ज्युनियर शिष्यवृत्ती, शिक्षानिधी तसेच व्यावसायिक प्रशिक्षणांत जीवनकौशल्ये, इंग्रजी संभाषण आणि डिजिटल साक्षरता यांचा समावेश आहे.