शिक्षण सेवक योजना रद्द करा
पहिल्या दिवसापासून नियमित वेतन द्या
युवा विद्यार्थी असोसिएशनची मागणी; शासनाला निवेदन
Shikshan Sevak Salary Update: राज्यातील शिक्षण सेवकांना तीन वर्षे अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना नियुक्तीच्या पहिल्याच दिवसापासून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष तुषार देशमुख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शासनाकडे निवेदन सादर केले आहे.
शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झाल्यानंतर शिक्षकांना अध्यापनासह परीक्षा, दप्तर तपासणी, निवडणूक आणि जनगणनेसारखी अशैक्षणिक कामे करावी लागतात. मात्र, नियमित शिक्षकांप्रमाणेच जबाबदाऱ्या पार पाडूनही त्यांना केवळ मानधन दिले जाते. या तीन वर्षांच्या सेवाकाळाचा सेवाज्येष्ठता, नियमित वेतनवाढ आणि वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पूर्ण लाभ मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दुर्गम भागात नियुक्ती झालेल्या शिक्षण सेवकांसमोर आर्थिक अडचणी अधिक तीव्र होतात. अनेक शिक्षकांना घरापासून ३०० ते ६०० किलोमीटर अंतरावर जावे लागते. भाडे, प्रवास, भोजन आणि कुटुंबाचा खर्च भागवताना अल्प मानधनात संसार चालवणे कठीण होत असल्याचे तुषार यांनी नमूद केले आहे.
सध्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना १६ हजार, माध्यमिकला १८ हजार, तर उच्च माध्यमिकला २० हजार रुपये मानधन मिळते. याउलट केंद्रीय विद्यालय, नवोदय आणि दिल्लीतील शिक्षकांना सुरुवातीपासून वेतनश्रेणी लाभ मिळतो. त्यामुळे सेवक कालावधी एक वर्षावर आणावा किंवा मानधन दुप्पट करावे, अशी पर्यायी मागणीही करण्यात आली आहे.
सध्या शिक्षण सेवकांना किती मानधन मिळते?
सध्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांना १६,००० रुपये, माध्यमिकला १८,००० रुपये, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना २०,००० रुपये मासिक मानधन मिळते.
शिक्षण सेवकांच्या संदर्भात कोणती प्रमुख मागणी करण्यात आली आहे?
शिक्षण सेवकांचा कालावधी १ वर्षावर आणावा किंवा त्यांचे सध्याचे मानधन दुप्पट करावे, अशी पर्यायी मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय विद्यालय आणि नवोदयच्या शिक्षकांना कोणता लाभ मिळतो?
केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि दिल्लीतील शिक्षकांना नोकरीच्या सुरुवातीपासूनच पूर्ण वेतनश्रेणीचा (Pay Scale) लाभ दिला जातो.