फोटो सौजन्य - Social Media
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मराठी भाषेच्या सक्तीबाबत आणि शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शाळा कोणत्याही प्रकारची असो, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी किंवा सरकारी. प्रत्येक शाळेत मराठी विषय अनिवार्यरित्या शिकवला गेला पाहिजे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) संलग्न शाळांमध्येही राज्यभाषा मराठी शिकवणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. या बैठकीला आयुक्त भूषण गगराणी, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त डॉ. प्राची जांभेकर, शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. भुसे यांनी प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत म्हणणे अनिवार्य करण्याचे आदेश दिले. तसेच मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शाळांमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ हा वृक्षारोपण उपक्रम राबवण्याची सूचना करताना भुसे म्हणाले की, प्रत्येक झाडाला QR कोड द्यावा आणि त्याचा वाढदिवस साजरा करावा. प्रत्येक विद्यार्थी किंवा अधिकारी एका झाडाची जबाबदारी घेईल, यामुळे पर्यावरणाची जाणीव आणि जबाबदारी दोन्ही वाढतील. भविष्यात इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आधार आणि अपार आयडीची पडताळणी, आरोग्य तपासणी, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम, शिक्षक समायोजन यावर भर देण्यात येईल. शिक्षकांनी दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा घ्याव्यात. विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रुम’ सुविधा उपलब्ध करावी.
कलाक्षेत्रात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी चर्नी रोड येथील बालभवन प्रकल्पाचे वेळापत्रक आखून शैक्षणिक सहली आयोजित करण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.