फोटो सौजन्य - Social Media
मुंबई विद्यापीठात अनुकंपा तत्त्वावर कार्यरत असलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांना अखेर स्थायित्व मिळाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत या निर्णयाला कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सेवेत असूनही अनिश्चिततेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत अनुकंपा तत्त्वावर झालेल्या नियुक्त्यांचा आढावा घेण्यात आला आणि सेवा नियमित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सर्वच विभागांनी १५० दिवसांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या अंतर्गत आकृतीबंध (Organizational Structure) अद्ययावत करणे, नियुक्ती नियमांमध्ये सुधारणा करणे आणि अनुकंपा तत्त्वावरील भरती १०० टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील प्रलंबित प्रकरणांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे, तर त्यांच्यामागे उभ्या असलेल्या कुटुंबीयांनाही स्थैर्य मिळणार आहे. अनेकजण दीर्घकाळापासून तात्पुरत्या स्वरूपात काम करत होते, त्यांना आता वेतन, सेवासुरक्षा, आणि इतर शासकीय लाभ नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळतील. यावेळी मंत्री पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभागात अनुकंपा तत्त्वावर असलेल्या सर्व रिक्त पदांचा तातडीने आढावा घ्यावा आणि नियमानुसार १०० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच, या प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग राखण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनात स्थैर्य येईल, तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत आणि मनोबलात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.